Farmers Protest: शेतकऱ्यांच्या ‘चक्काजाम’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 04:39 AM2021-02-07T04:39:05+5:302021-02-07T07:44:14+5:30

वाहतूक काही काळ ठप्प; राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग रोखले

farmers protest Mixed response to farmers chakka jam agitation the state amp | Farmers Protest: शेतकऱ्यांच्या ‘चक्काजाम’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद

Farmers Protest: शेतकऱ्यांच्या ‘चक्काजाम’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद

Next

मुंबई : केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी झालेल्या ‘चक्काजाम’ला संमिश्र प्रतिसाद लाभला. यामुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

विदर्भात वर्धा जिल्ह्यात पवनार, तळेगाव (शामजी पंत) हिंगणघाट, धोत्रा वायगाव येथे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह डाव्या पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. अमरावती-नागपूर महामार्गावरची वाहतूक तळेगावजवळ ठप्प झाली होती. यवतमाळात दिल्ली-कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्गावर पांढरकवडानजीक वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्यासह शेतकऱ्यांना अटक केली. वणी, पुसद, उमरखेड, महागाव, दारव्हा आदी तालुक्यातही रास्ता रोको आंदोलनात विविध संघटनांनी सहभाग नोंदवला.

वाशिममध्ये कारंजात रास्तारोको आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूक जागीच ठप्प झाली होती. अकोल्यातील वाशिम बायपास चौक, मलकापूर, बोरगावमंजू व पातूर येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय किसान मोर्चा व संयुक्त किसान समन्वय समितीसह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. मेहकर, चिखली, डोणगाव, खामगाव, संग्रामपूर या भागात शेतकरी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले.

चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसने रास्तारोको केला. ब्रह्मपुरीतही सर्व पक्षीय व विविध संघटनांनी रास्ता रोको केला. कोरपना येथे जनविकास आघाडीने कायद्याची होळी केली. 

कोल्हापुरात पोलिसांनीच उधळला चक्काजाम
कोल्हापूर : चक्काजाम आंदोलन कोल्हापुरात सुरू होण्याआधीच पोलिसांनी बळाचा वापर करून उधळून लावले. दाभोळकर कॉर्नर चौकात रस्ता रोखण्यासाठी आलेल्या किसान संघर्ष समन्वय समितीच्या आंदोलकांना आंदोलन सुरू करण्याआधीच पोलीस व्हॅनमध्ये जबरदस्तीने काेंबले. यावर संतापलेल्या आंदोलकांनी ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, ‘मागे घ्या, मागे घ्या, काळे कायदे मागे घ्या’, अशा त्वेषपूर्ण घोषणांचा जयघोष सुरू केला. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये जाेरदार झटापटही झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. चक्काजाम करण्यासाठी मानवी साखळी करण्यास सुरुवात करताच शांत बसलेले पोलीस एकदम आक्रमक झाले. एकाच वेळी शंभरभर पोलीस रस्त्यावर उतरले आणि त्यांनी एकेका आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे आंदोलकांचाही गोंधळ उडाला. एवढ्यात माजी खा. राजू शेट्टी आंदोलनस्थळी पोहोचले आणि आंदोलकांमध्ये पुन्हा जोश संचारला.

मराठवाड्यात आंदोलन 
हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अ. भा. किसान संघर्ष समन्वय समितीने आंदोलन केले. सकाळी ११ पासून समितीचे पदाधिकारी ठाण मांडून होते. बीडमध्ये शेतकरी संघटनांच्या वतीने परभणी- गंगाखेड रस्त्यावर चक्काजाम करण्यात आले. जालना जिल्ह्यात राजूर (ता. भोकरदन) व जाफराबाद येथे चक्काजाम झाले. लातूर जिल्ह्यात जिल्हा काँग्रेसने आंदोलनात सहभाग नोंदविला. 

Web Title: farmers protest Mixed response to farmers chakka jam agitation the state amp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.