शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा!
By admin | Published: August 29, 2015 02:32 AM2015-08-29T02:32:45+5:302015-08-29T02:32:45+5:30
दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी थेट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्या वाहनांचा ताफा अडवला.
शिर्डी (जि.अहमदनगर) : दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी थेट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्या वाहनांचा ताफा अडवला. त्यामुळे प्रशासनाचे अधिकारीही काही काळ गोंधळले होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या़
अशोक गजपती राजू यांनी शुक्रवारी सकाळी साईदर्शनानंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बगाटे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे आदींसह शिर्डी विमानतळाची पाहणी केली़ त्यानंतर ते परतत असताना कोऱ्हाळे गावातील शेतकरी अचानक ताफ्याला आडवे आले़ ते पाहून राजू वाहनातून खाली उतरले व शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या़
पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, याकडे सरकार लक्ष देत नाही, अशा तक्रारी त्यांनी मांडल्या़ शेतकरी मराठीत व्यथा मांडत होते. (प्रतिनिधी)
साईसमाधी शताब्दीपूर्वी
शिर्डी विमानतळ कार्यान्वित
शिर्डी विमानतळाला निधीची कमतरता नाही. हे विमानतळ साईसमाधी शताब्दीपूर्वी कार्यान्वित होईल, असे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. आठवडाभरात येथील अडचणी व त्यावरील उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.
अशोक गजपती राजू यांनी शिर्डी विमानतळाची पाहणी केली़ या वेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी के़ एच़ बगाटे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, अभियंता राजकुमार बेरी, तहसीलदार सुभाष दळवी त्यांच्यासोबत होते. संस्थानच्या सभागृहात त्यांनी अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला.
व्यथा पोहोचविणार
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार पीक विमा योजनेपासून अनेक योजना आणत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची व्यथा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचे हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले.
मंत्री महोदयांना हिंदी व इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषा समजत नसल्याने संवादात अडथळा निर्माण झाला़ तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय आपल्या अखत्यारीतील असल्याचे सांगत राजू यांना शेतकऱ्यांची व्यथा कथन केली.