शेतक-यांनी ८0 लाख क्विंटल कापूस विकला व्यापा-यांना!

By admin | Published: April 15, 2015 12:17 AM2015-04-15T00:17:34+5:302015-04-15T00:17:34+5:30

मग बोनस देणार कोणाला? एकरी मदत मिळण्यासाठी शेतकरी सरसावला.

Farmers sell 80 lakh quintals of cotton to businessmen! | शेतक-यांनी ८0 लाख क्विंटल कापूस विकला व्यापा-यांना!

शेतक-यांनी ८0 लाख क्विंटल कापूस विकला व्यापा-यांना!

Next

राजरत्न सिरसाट/अकोला : राज्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना चार महिन्यांनंतर पुन्हा एकदा बोनस देण्याचे संकेत शासनाने दिले ; पण आर्थिक गरजेपोटी त्यांनी ८0 लाख क्विंटल कापूस व्यापार्‍यांना विकला आहे. बोनस तर सीसीआय आणि पणन महासंघाला कापूस विकणार्‍या शेतकर्‍यांना दिले जाणार असल्याचे वृत्त आहे. मग ज्या शेतकर्‍यांनी गरजेपोटी कापूस विकला, त्या शेतकर्‍यांचं काय, असा प्रश्न उपस्थित होतो. मदत करायचीच असेल, तर शासनाने एकरी, हेक्टरी मदत करावी, असा सूर शेतकर्‍यांमधून उमटत आहे. कापूस उत्पादनात प्रचंड घट झाली असून, खरिपातील कापसाचा वेचा एव्हाना संपला आहे. यावर्षी कापूस खरेदी केंद्रे लवकर सुरू न झाल्याने आर्थिक गरजेपोटी सुरुवातीलाच अल्पभूधारक शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना कापूस विकला. राज्यात आतापर्यंत पावणेदोन लाख क्विंटलच्या वर शेतकर्‍यांनी कापूस विकला असून, यातील ८0 लाख क्विंटल भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) आणि तेवढाच कापूस व्यापार्‍यांनी खरेदी केला आहे. कापूस उत्पादक पणन महासंघाने यावर्षी २८ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. दरम्यान, राज्याचे महसूल तथा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी कापूस उत्पादक शेतकर्‍यांना अग्रीम बोनस देण्याबाबत सरकार अनुकूल असल्याची घोषणा तीन महिन्यांपूर्वी अकोला येथे केली होती. त्यामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण पंधरा दिवसांतच बोनस देता येत नसल्याचे घूमजाव त्यांनी केल्याने शेतकर्‍यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. आता पुन्हा बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केल्याने व्यापार्‍यांना कापूस विकणारे शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बोनसऐवजी एकरी, हेक्टरी मदत करावी, याकरिता शेतकरी सरसावला आहे. यापूर्वी कापूस एकाधिकार योजनेत शेतकर्‍यांना पणन महासंघामार्फतच अग्रीम बोनस देण्यात येत होते; परंतु कापूस एकाधिकार योजना गुंडाळल्यानंतर अग्रीम बोनस देण्याची योजना त्याचवेळी बंद पडली. दुष्काळी स्थिती बघता, यावर्षी अग्रीम बोनस देण्यास राज्य शासन अनुकूल आहे; पण या बोनसचा फायदा व्यापार्‍यांनाच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणनन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन. पी हिराणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पणन महासंघ आणि सीसीआयला कापूस विकणार्‍या शेतकर्‍यांनाच बोनसचा फायदा होणार असेल, तर खासगी व्यापार्‍यांना कापूस विकणार्‍या शेतकर्‍यांनी जावे कोठे, असा प्रश्न शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे एकरी, हेक्टरी मदत करावी, असा शेतकर्‍यांचा सूर आहे. शासनाने कापूस हंगामाच्या सुरुवातीला बोनसची खात्री दिली असती, तर शेतकर्‍यांनी पणन व सीसीआयलाच कापूस विकला असता, असे ते म्हणाले.

Web Title: Farmers sell 80 lakh quintals of cotton to businessmen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.