शेतकऱ्यांनी सुधारित सातबारा उपक्रमात सहभागी व्हावे - बाळासाहेब थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 06:15 PM2021-10-02T18:15:29+5:302021-10-02T18:16:05+5:30

Balasaheb Thorat : शासनाच्या महसूल विभागाकडून संपूर्ण राज्यभरात सुधारित सातबारा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पुरंदर तालुक्यातील खळद येथे पाच शेतकऱ्यांना सुधारित सातबाराचे वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

Farmers should participate in the revised Satbara initiative - Balasaheb Thorat | शेतकऱ्यांनी सुधारित सातबारा उपक्रमात सहभागी व्हावे - बाळासाहेब थोरात 

शेतकऱ्यांनी सुधारित सातबारा उपक्रमात सहभागी व्हावे - बाळासाहेब थोरात 

Next

जेजुरी : राज्यातील शेतकरी बांधवांनी शासनाच्या ई पीक पाहणीसह सुधारित सातबारा उपक्रमात सहभागी होऊन आपले शेतीबाबतचे रेकॉर्ड अधिकृत करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

शासनाच्या महसूल विभागाकडून संपूर्ण राज्यभरात सुधारित सातबारा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पुरंदर तालुक्यातील खळद येथे पाच शेतकऱ्यांना सुधारित सातबाराचे वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुरंदर तालुक्यातील पानंद रस्ते चळवळीची सुरवात ही खळद ते चिंचोळे मळा या पानंद रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करून सुरवात झाली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम होते. पुरंदर हवेलीचे आ. संजय जगताप, पुणे विभागीय आयुक्त सौरव राव,  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी विकास देशमुख, पाणी पंचायतच्या कल्पनाताई साळुंखे माजी आ. अशोक टेकवडे आदीसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.  

यावेळी बोलताना महसूलमंत्री थोरात यांनी महसूल विभागाकडून राज्यभरातील शेत जमिनीचे सातबारा आधुनिक पद्धतीने बनवण्यात आले आहेत. सात बारा वरील सर्व नोंदी जशाच्या तशा ठेवून अनावश्यक नोंदी, चुकीच्या नोंदी काढून टाकण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर मोबाईल अप वरून आपल्याला आपल्या शेतातील पीक पहाणीची नोंदणी ही करता येते. स्वतःच स्वतः च्या शेतातील पिकांची नोंदणी करू शकतो .शेतील झालेले बदल ही नोंदवता येतात आणि आपला सातबारा आपल्याला केव्हाही काढता ही येतो. 

पीक रचना, पीक नुकसान शेतीचे झालेले नुकसान स्वतः शेतकरी शेतात उभे राहून नोंदवू शकतो, त्यामुळे पीक विमा, महसूल विभागाला आपल्या शेतीची बिनचूक माहिती मिळू शकेल. शासनाला ही एका क्लीक वर संपूर्ण राज्यातील शेतीपिकांची माहिती उपलब्ध होईल इतका अद्ययावत असा सातबारा असणार आहे. राज्यातील शेतकरी आता आधुनिक शेतकरी बनला आहे.त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

हा उपक्रम सध्या महाराष्ट्रातील शासन राबवत आहे. हा उपक्रम भविष्यात देशातील सर्वच राज्य सरकारे किंवा केंद्र शासन ही राबवेल अशी खात्री ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच,  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म. गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत आजपासून इ पीक पाहणी नोंदणीसह आधुनिक सातबारा वाटपाचा शुभारंभ करून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा दिला आहे .  पुरंदरच्या ऐतिहासिक भूमीतुन हा उपक्रम राज्यभरात सुरू होतोय. याचा मोठा फायदा कृषी विभागाला नक्कीच होणार आहे. अशा शब्दात कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी महसूलमंत्र्यांचे आभार मानले. 

पुरंदर तालुक्यातएकूण ९३ ग्रामपंचायतीकडून तालुक्यात ५०० पेक्षा जास्त पानंद रस्त्यांची तहसीलदारांकडे मागणी आहे. सुमारे ४३० किमी लांबीच्या या सर्व पानंद रस्त्यासाठी शासनाकडून पाच कोटींचा निधी ही उपलब्ध होत आहे.आजच्या कार्यक्रमातून पुरंदर मधील खळद ते चिंचोळे मळा या  पानंद रस्त्याच्या कामाला ही सुरुवात झाली असून ही पानंद रस्त्याची चळवळ यशस्वी करू. त्याचबरोबर महसूल विभागाच्या सुधारीत सात बारा उपक्रमात तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग असून ३५ हजारपेक्षा जास्त सुधारित सातबारा तयार झालेले आहेत. पुरंदरचा महसूल विभाग अत्यंत प्रामाणिकपणे आणि तेवढ्याच वेगाने या उपक्रमात शेतकऱ्यांना सहभागी करून घेत असल्याचे आ.संजय जगताप यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरव राव, पाणी पंचायतीच्या कल्पनाताई साळुंके, आदींची भाषणे झाली. तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले. आभार प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी मानले तर आयोजन पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Web Title: Farmers should participate in the revised Satbara initiative - Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.