"हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवणारे; बळीराजाचं राज्य हवं असेल तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 08:33 PM2023-07-26T20:33:34+5:302023-07-26T20:34:28+5:30
जयंत पाटील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाले आक्रमक
Jayant Patil vs BJP Govt: देशात आणि राज्यात सध्या शेतकरी विरोधी सरकार अस्तित्वात आहे. दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष केले जात आहे. आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत. सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवणारे सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे बळीराजाचं राज्य पुन्हा आणण्याकरिता शरद पवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. तरच शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील आणि न्याय देणारं सरकार सत्तेत येईल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली. आम आदमी पार्टीच्या शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपिन चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांनी आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, "शेतकरी विरोधी सरकारला त्यांची जागा दाखवण्याकरिता शेतकऱ्यांच्या संघटनेची ताकद एकत्रित आली पाहिजे त्यानंतर शेतकरी विरोधी सरकारला आपण धक्का लावू शकतो. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आणता येणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या वर्षभरात अनेक नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांनी तोंड दिले आहे. सरकारने घोषणा करायची मात्र मदत करायची नाही असे धोरण सरकारचे आहे. विलंबाने करण्यात आलेल्या मदतीला काही अर्थ राहत नाही. आजही महाराष्ट्रातील काही भागात पाऊस आहे तर काही भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणीचे संकट देखील आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना कुठलीही मदत देण्यात येत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत."
"एकेकाळी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आत्महत्या होत असताना शरद पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री असताना पंतप्रधान यांना यवतमाळ मध्ये घेऊन आले होते. यावेळी त्या शेतकऱ्यांना 6 हजार कोटी रुपयांचे केंद्राकडून पॅकेज मंजूर करून देण्याचे काम पवार साहेबांनी केले होते. शेतकऱ्यांचे समस्या सोडवण्यासाठी शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांकरिता विविध योजना आत्महत्याग्रस्त भागात राबवल्या होत्या," याची आठवण जयंत पाटील यांनी सध्याच्या सरकारला करून दिली.
"देशात सध्या काय चाललं आहे सर्वांनाच माहित आहे. शेतकरी आंदोलन करत आहे मात्र सरकार दुर्लक्ष करत आहे. मणिपूर मधील घटने वर चर्चा करण्यात यावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर बोलावे याकरता विरोधकांकडून मागणी करणाऱ्या खासदारांना निलंबित करण्याचे काम करण्यात येत आहे. देशातील जनता अस्वस्थ आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. देशातील महिला सुरक्षित नाहीत. या मानसिकतेतून देशाला बाहेर काढण्यासाठी अधिक ताकतीने शरद पवार यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांचा विकास हा केवळ 'जाणता राजा' शरद पवार यांच्या नेतृत्वातच होऊ शकतो. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्याची क्षमता केवळ शरद पवार यांच्यातच आहे," असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.