कर्जबाजारी पित्याच्या मृत्यूनंतर शेतकरी मुलाने केली आत्महत्या

By admin | Published: July 16, 2017 05:44 PM2017-07-16T17:44:16+5:302017-07-16T17:44:16+5:30

कर्जबाजारी पित्याच्या मृत्यूनंतर आपलीही या कर्जातून सुटका होणार नाही या विवंचनेत अपंग असलेल्या मुलानेही वीजप्रवाहास स्पर्श करुन आत्महत्या केल्याची

Farmer's son committed suicide after debt of father-in-law | कर्जबाजारी पित्याच्या मृत्यूनंतर शेतकरी मुलाने केली आत्महत्या

कर्जबाजारी पित्याच्या मृत्यूनंतर शेतकरी मुलाने केली आत्महत्या

Next

ऑनलाइन लोकमत
मुखेड (जि.नांदेड), दि. 16 - कर्जबाजारी पित्याच्या मृत्यूनंतर आपलीही या कर्जातून सुटका होणार नाही या विवंचनेत अपंग असलेल्या मुलानेही वीजप्रवाहास स्पर्श करुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मुखेड तालुक्यातील होकर्णा येथे घडली.
मुखेड तालुक्यातील होकर्णा येथील अल्पभूधारक शेतकरी व्यंकटी विठोबा लुट्टे (वय ७०) यांच्यावर बँक आणि खाजगी सावकाराचे कर्ज होते़ त्यातच व्यंकटी लुट्टे हे अर्धांगवायूच्या आजाराने मागील अनेक दिवसांपासून त्रस्त होते़ उपचारानंतरही त्यांचा त्रास कमी झाला नव्हता़ तर उपचारासाठी उसनवारीने अनेक जणांकडून पैसे घेतले होते़ बँकेचे सुद्धा त्यांच्या नावावर कर्ज होते़ पण सततच्या दुष्काळामुळे व रोज होणाऱ्या आजारावरील खर्चामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली होती.
त्यातच घरातील कर्ता मुलगा म्हणून नागनाथ व्यंकटराव लुट्टे (वय ४०) यांच्यावर जबाबदारी पडली होती़ परंतु दुर्देवाचा फेरा संपला नव्हता़ काही दिवसापूर्वीच कमावत्या नागनाथ यांचा मोटरसायकलवरून पडून अपघात झाला़ त्यात पाय मोडला़ त्याच्या उपचारासाठीही पुन्हा कर्ज काढले, परंतु नागनाथला कायमचे अपंगत्व आल्याने लुट्टे कुटुंबियांच्या उरल्या-सुरल्या आशाही मावळल्या़
एकामागून एक येणाऱ्या संकटामुळे लुट्टे कुटुंबिय पुरते हवालदिल झाले होते़ त्यात १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता व्यंकटी लुट्टे यांचा अर्धांगवायूने मृत्यू झाला़ सर्व कुटुंबिय शोकसागरात बुडालेले असताना, नागनाथला मात्र वडिलांवर असलेले बँकेचे कर्ज आणि खाजगी व्यक्तीची उसनवारी कशी फेडणार? या चिंतेने ग्रासले होते़ घरातील परिस्थिती हलाखीची अन् त्यात आलेले अपंगत्व त्यामुळे यापुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह आपण करू शकणार नाही, या विचारातच वडिलांच्या मृत्यूनंतर तासाभरातच नागनाथ लुट्टे यांनी घराशेजारील सार्वजनिक विद्युत डीपीतील विद्युत प्रवाहाच्या तारेला स्पर्श केला़ क्षणात वीजेच्या जबर धक्क्याने त्याचा मृत्यू झाला़ ही बाब अंत्यविधीसाठी जमलेले नातेवाईक आणि ग्रामस्थांना कळाल्यानंतर सर्वजण शोकसागरात बुडाले.
मुखेड येथे नागनाथची उत्तरीय तपासणी केल्यानंतर १६ जुलै रोजी राहत्या गावी होकर्णा येथे एकाच चितेवर बाप-लेकाला भडाग्नी देण्यात आला़ मयत नागनाथ यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे़ एकाच परिवारातील दोन कर्ते पुरुष गेल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला़ घटनेची मुखेड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली़ तपास पोलिस उपनिरीक्षक पी़एम़ सांगळे करीत आहेत.

Web Title: Farmer's son committed suicide after debt of father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.