शिक्षणासाठी पैसे नसल्याने शेतकरीपुत्राची आत्महत्या
By admin | Published: April 23, 2016 03:59 AM2016-04-23T03:59:48+5:302016-04-23T03:59:48+5:30
घरी अवघी एक एकर शेती, त्यात नापिकी. संसाराचा गाडा ओढण्यासाठी पित्याची आधीच होत असलेली ओढाताण.
सायखेड (अकोला) : घरी अवघी एक एकर शेती, त्यात नापिकी. संसाराचा गाडा ओढण्यासाठी पित्याची आधीच होत असलेली ओढाताण. त्यामुळे शिक्षणासाठी पैसा कुठून येईल, या चिंतेतून नववीतील एका शेतकरी पुत्राने विष प्राशन करून स्वत:चे जीवन संपविले. दुष्काळाची दाहकता दर्शविणारी आणि मन सुन्न करणारी घटना अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती गावात गुरुवारी घडली. आकाश मधुकर मंजुळकर असे मृत मुलाचे नाव आहे.
आकाशकडून कुटुंबातील सदस्यांची होणारी ओढाताण पाहवली गेली नाही. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले. अकोलातील शेतकऱ्यांना तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. कर्ज काढून पिके घ्यायची, प्रसंगी संपूर्ण कुटुंब
शेतात राबायचे; मात्र हंगामाच्या शेवटी मशागत व लागवडीचाही खर्चही निघणार नाही, एवढे पीक होत आहे. शेतकरी, शेतमजुराची आत्महत्या
उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथील गौतम भीमराव वाघमोडे (३५) या शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून शुक्रवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली़त्यांच्याकडे दीड एकर शेती असून त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते़ हिंगोलीतील अंधारवाडी येथे गरिबीला कंटाळून गोमाजी कान्होजी इंगळे (५०) या शेतमजुराने शुक्रवारी सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली. मुलगी अनुसयाचा साखरपुडा झाल्यानंतर घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र दुष्काळामुळे काम मिळत नसल्याने ते विवंचनेत होते.