शेतकऱ्याचा मुलगा जेईई मेन्समध्ये देशात पहिला; नवी मुंबईतील दक्षेश मिश्रा देशात दुसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 08:19 AM2024-04-26T08:19:09+5:302024-04-26T08:19:42+5:30
नवी मुंबईतील दक्षेश मिश्रा याने देशभरातून दुसरा रँक मिळवला आहे, तर हरयाणाचा आरव भट हा विद्यार्थी देशातून तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मुंबई / नागपूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन्समध्ये नागपुरात शिक्षण घेत असलेला नीलकृष्णा निर्मलकुमार गजरे हा विद्यार्थी देशात पहिला आला आहे. मूळचा वाशिम जिल्ह्यातील नीलकृष्णाने परीक्षेत १०० टक्के पर्सेंटाईल मिळवत नागपूर व वाशिमचे नाव राष्ट्रीय स्तरावर पाेहोचविले आहे.
नीलकृष्णा हा बेलखेड (ता. मंगरूळपीर) या छाेट्याशा खेड्यातील शेतकरी निर्मलकुमार गजरे यांचा मुलगा आहे. दहावीपर्यंत कारंजा येथे शिकलेला नीलकृष्णाने त्यानंतर शेगावच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. आयआयटी मुंबईचे ध्येय ठरविलेल्या नीलकृष्णाने पुढच्या तयारीसाठी नागपूर गाठले व एका खासगी शिकवणीतून अभ्यास केला.
नवी मुंबईतील दक्षेश मिश्रा याने देशभरातून दुसरा रँक मिळवला आहे, तर हरयाणाचा आरव भट हा विद्यार्थी देशातून तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुलींमधून कर्नाटकची सानवी जैन आणि दिल्लीची शायना सिन्हा यांनी १०० पर्सेंटाईल मिळविले आहेत. निकालात नागपूरच्या चार विद्यार्थ्यांनी पहिल्या १०० मध्ये स्थान प्राप्त केले. यात मूळचा दर्यापूर येथील व पाच वर्षांपासून नागपुरात शिक्षण घेत असलेला माेहम्मद सुफियान या विद्यार्थ्याने १६ वी रँक प्राप्त केली.
मोबाइल, सोशल मीडियाला सुट्टी
पहाटे उठून अभ्यास, त्यानंतर पाच तास क्लासेस आणि त्यानंतर पुन्हा ५ ते ६ तास अभ्यास असे वेळापत्रक नीलकष्णाने निश्चित केले हाेते. या काळात साेशल मीडिया किंवा माेबाइलपासून ताे दूरच राहिला. ॲडव्हान्समध्येही सर्वाेत्तम स्काेअर करून ध्येय मिळविण्याचा विश्वास त्याने ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केला.