शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच
By admin | Published: April 17, 2017 02:50 AM2017-04-17T02:50:06+5:302017-04-17T02:50:06+5:30
विदर्भात दोन तर मराठवाड्यात एकाने जीवन संपविले
यवतमाळ/ बीड : शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून यवतमाळ जिल्ह्यात दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर बीडमध्ये गरीबीला कंटाळून शेतमजुराने विषप्राशन करून जीवन संपवले.
यवतमाळच्या वणी तालुक्यातील मजरा येथे सुभाष महादेव कसारे (३५) या शेतकऱ्याने घरी गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी बराच वेळ होऊनही तो बाहेर आला नाही. त्याला आवाज देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा तोडून आतमध्ये बघितले असता, सुभाषचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्याची पत्नी माहेरी गेली असून सुभाषच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.
यवतमाळ तालुक्यातील वाटखेड येथील योगेश रामराव मुरमुरे (३८) याने आत्महत्या केली. त्याने गुरुवारी रात्री विषप्राशन केले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वडिलांच्या नावावर दहा एकर शेती असून संपूर्ण शेती योगेशच सांभाळत होता. या शेतीवर दोन लाख रुपये खर्च आहे. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्याने आत्महत्या केली. बीड जिल्ह्यात रविवार सकाळी शहाजी रामकिसन घायाळ (४५) या शेतमजुराने गरिबीला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)