अमरावतीत कर्जबाजारी शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 03:41 PM2018-03-01T15:41:55+5:302018-03-01T15:41:55+5:30
अनिल बकाले हे चार दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह २८ फेब्रुवारी रोजी जळका जगताप मार्गातील भगत यांच्या शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आला.
चांदूर रेल्वे (अमरावती) : तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने जळका शिवारातील शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अनिल वासुदेवराव बकाले (४०, रा. आमला विश्वेश्वर) असे दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
अनिल बकाले हे चार दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह २८ फेब्रुवारी रोजी जळका जगताप मार्गातील भगत यांच्या शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आला. अनिल बकाले यांच्या डोक्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दीड लाखांचे कर्ज होते. त्यांच्याकडील पाच एकर शेतात यंदा सोयाबीन, कपाशी, तूर ही पिके होती. त्यापैकी सोयाबीन पिकले नाही, तर कापूस चार क्विंटल आणि तुरीचे तीन क्विंटल पीक आले होते. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. याच नैराश्यातून त्यांनी आत्मघात केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात दोन धाकटे भाऊ, आई, पत्नी, सहा वर्ष व आठ महिने वयाची दोन मुले आहेत.