जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: June 9, 2017 04:45 AM2017-06-09T04:45:15+5:302017-06-09T04:45:15+5:30
हिंगणी बु. येथील एका शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मुलीला मारहाण करणाऱ्यांना अटक करून शिक्षा करावी, या मागणीसाठी हिंगणी बु. येथील एका शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच प्रशासनाने हस्तक्षेप करीत कारवाईचे आश्वासन दिल्याने हा शेतकरी खाली उतरला.
बीड तालुक्यातील हिंगणी बु. येथील त्र्यंबक विश्वनाथ तोडकर यांची विवाहित मुलगी कविता रमेश लिंगे हिला शेजारी राहणाऱ्या सचिन आणि नितीन कल्याण ताटे तसेच सुनीता कल्याण ताटे या तिघांनी मारहाण केली. यामध्ये कविताचा एक पाय निकामी झाला. ही घटना २० एप्रिल २०१५ रोजी घडली होती. त्यानंतर त्र्यंबक तोडकर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवल्यावर या तिघांवर गुन्हाही दाखल झाला. परंतु पोलिसांनी पुढे कारवाई केली नाही. ते अद्यापही मोकाटच आहेत. शिवाय हे सर्व घराजवळच राहत असल्याने आम्हाला नेहमी मानसिक, शारीरिक त्रास देत आहेत. आम्ही याला वैतागलो आहोत, असे तोडकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
>५ जूनपासून आंदोलन
पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने तोडकर हे कविताला सोबत घेऊन ५ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. तीन दिवस उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतापलेल्या तोडकर यांनी गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एका झाडावर चढून गळ्याला दोरीने फास आवळला होता.
तहसीलदार शिंगोटे व शिवाजी नगर पोलिसांकडून त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाले, तेव्हाच ते खाली उतरले.