पोलिसांच्या व्हॅनमध्ये शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: March 25, 2017 02:37 AM2017-03-25T02:37:40+5:302017-03-25T02:37:40+5:30
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटण्यावरून शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादानंतर, औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर भुसारे
मुंबई : मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटण्यावरून शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादानंतर, औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर भुसारे यांनी वायरलेस व्हॅनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी भुसारेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भुसारे यांना गारपिटीमुळे फटका बसला. त्यांचे शेत पूर्ण उद्ध्वस्त झाले, याची नुकसान भरपाई मिळावी, म्हणून गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी आग्रह धरला. मात्र, मंत्रालय बंद होण्याची वेळ झाल्याने पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यातच त्यांनी पोलिसांच्या हातावर चावा घेतला. या घटनेनंतर भुसारेंना पोलीस व्हॅनमधून नेत असताना त्याची पोलिसांसोबत बाचाबाची सुरू होती. याच दरम्यान वायरलेस व्हॅनमध्ये असलेल्या दोरखंडाने त्यांनी गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच अडविले. यामुळे हे प्रकरण आणखी तापले. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली. (प्रतिनिधी)