कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Published: May 4, 2017 02:18 AM2017-05-04T02:18:27+5:302017-05-04T02:18:27+5:30

शिर्सुफळ (ता. बारामती) येथील शेतकरी काशिनाथ सिधू हिवरकर (वय ६०) या शेतकऱ्याने कर्जाचा बोजा झाल्याने आपली

Farmer's suicide by bribing debt | कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Next

बारामती : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील शेतकरी काशिनाथ सिधू हिवरकर (वय ६०) या शेतकऱ्याने कर्जाचा बोजा झाल्याने आपली जीवनयात्रा संपवली. महिन्याभरात बारामती तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने राजकीय पंढरी हादरून गेली आहे.
काशिनाथ सिधू हिवरकर यांच्याकडे सोसायटी, बँक आणि खासगी सावकार तसेच संबंधातील लोकांचे हातउसने घेतलेले पैसे याचा बोजा वाढत चालला होता. त्यामुळे त्यांच्याकडे या सर्व लोकांनी तगादा लावला होता. सततच्या दुष्काळामुळे शेतीतून कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाची मदत मिळाली नाही. त्यातच कोणत्याही शेतमालाला बाजारभाव नसल्याने कर्ज कोणत्या आधारे फेडायचे, अशा प्रकारचा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच काशिनाथ सिधू हिवरकर यांची सून मागील ६-७ वर्षांपासून सतत आजारी असल्यामुळे त्यांच्या उपचाराच्या खर्चाने ते कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे रात्री जेवण करताना आता मला आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे त्यांनी आपल्या घरच्यांना सांगितले. त्यांनी रात्री तीनच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सदर घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी सकाळी ६ वाजता भेट दिली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. हिवरकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी भेट दिली. बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी भेट दिली, त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.

१५ वर्षे दुष्काळ तसाच...
बारामती तालुक्यातील अर्धा भाग सतत दुष्काळी आहे. पिण्याच्या पाण्यासह शेती, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. अर्धा भाग नीरा डावा कालव्यामुळे सिंचनाखाली आला आहे. जिरायती भागाला उपसासिंचन योजनेखाली आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मनमानी पद्धतीने आवर्तने दिली जात आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस आघाडीचे सरकार असतानादेखील १५ वर्षांत येथील दुष्काळ हटला नाही. भाजपाच्या काळातदेखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे बारामतीसारख्या राजकीय पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यात महिनाभरातच दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण बारामती, इंदापूरात आले आहे.

राज्य सरकाराला अहवाल पाठवणार : तहसीलदार
बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी हिवरकर कुटुंबीयांची भेट घेतली. मयत शेतकरी काशीनाथ हिवरकर यांच्या आत्महत्येबाबत माहिती घेतली. या बाबतचा अहवाल राज्यसरकाला पाठवण्यात येणार आहे. त्यांच्यावरील कर्जाचा तपशीलदेखील घेतला जाणार आहे, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Farmer's suicide by bribing debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.