‘चाय पे चर्चा’ फेम गावात शेतक-यांची आत्महत्या
By admin | Published: February 25, 2015 02:14 AM2015-02-25T02:14:13+5:302015-02-25T02:14:13+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आर्णी तालुक्यातील दाभडी गावात
आर्णी (जि़ यवतमाळ) : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आर्णी तालुक्यातील दाभडी गावात एका कर्जबाजारी शेतकऱ्याने मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केली. विठ्ठल सवाई राठोड (४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा चंद्रपूर लोकसभा आणि भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांच्या केळापूर-आर्णी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या दाभडी गावात गत ५ वर्षांत १६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी २० मार्च २०१४ रोजी दाभडी गावाला भेट दिली होती. ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला होता. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून सत्ता मिळाल्यास त्या सोडविल्या जातील, असे आश्वासन या कार्यक्रमात त्यांनी दिले होते. ज्या गावातून त्यांनी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे दु:ख दूर करण्याचे आश्वासन दिले होते, त्याच गावातील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. विठ्ठलकडे अडीच एकर शेती असून, त्याच्यावर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५० हजार रुपयांचे कर्ज होते. नापिकीने हताश झालेल्या विठ्ठलने कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे.
या गावाला केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी ‘आदर्श संसद ग्राम’मध्ये दत्तक घेण्याचे ठरविले होते. मात्र लोकसंख्येचा निकष पूर्ण होत नसल्याने या गावाची निवड होऊ शकली नव्हती. तरीही या गावाचा संपूर्ण विकास करण्याचे अभिवचन गावकऱ्यांना दिले होते. मात्र शेतकरी विठ्ठल राठोडच्या आत्महत्येने दाभडी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (प्रतिनिधी)