तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: May 11, 2017 03:27 AM2017-05-11T03:27:13+5:302017-05-11T03:27:13+5:30
मुरबाड तालुक्यातील शेलगाव येथील अशोक शंकर देसले (५८) या शेतकऱ्याने बुधवारी तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शेलगाव येथील अशोक शंकर देसले (५८) या शेतकऱ्याने बुधवारी तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृताच्या नातेवाइकांनी मात्र ही आत्महत्या नसून मुरबाडचे तहसीलदार आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देसले यांना मारहाण करून खून केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
अशोक देसले हे मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. देसले यांच्या वडिलांच्या नावावरची जमीन त्यांच्या चुलत भावाने फसवणुकीने स्वत:च्या नावावर करून हडप केल्याची तक्रार देसले यांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये मुरबाड तहसीलदार कार्यालयात केली होती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ते सतत तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारत होते.
फिर्यादी तानाजी देसले (अशोक देसले यांचे भाऊ) यांनी तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांना या अर्जाबाबत विचारणा केली असता उद्धट भाषा वापरत त्यांनी तानाजी यांना बाहेर काढले.
तसेच हे प्रकरण हाताळण्यासाठी दोन लाखही मागितले होते. बुधवारी बुद्धपौर्णिमेची सुटी असतानाही अशोक देसले यांना बोलावण्यात आल्याचा आरोपही नातेवाईकांनी फिर्यादीत केला आहे.
दरम्यान, अशोक देसले यांच्या मृत्यूची वार्ता समजताच टोकावडे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी मुरबाड येथे धाव घेऊन तहसीलदारांना अटक करण्याची मागणी केली. लोकांना शांत करण्यासाठी मुरबाडचे आ. किसन कथोरे बराच वेळ मुरबाड पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. मात्र, आ. कथोरे हे तहसीलदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करून देसले यांच्या नातेवाइकांनी कथोरे यांची गाडी अडवली.