तुरखेड येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 20:49 IST2019-06-21T20:48:33+5:302019-06-21T20:49:08+5:30
विष प्राशन : पाण्याअभावी १२ एकरातील फळझाडे तोडली

तुरखेड येथे शेतकऱ्याची आत्महत्या
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील तुरखेड येथील शेतकरी गजानन सुखदेव सुकळकर (६०) यांनी स्वत:च्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. पाण्याअभावी आठ एकर शेतातील केळी व चार एकरांतील डाळिंबाची झाडे तोडावी लागली. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती पुढे आली आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तुरखेड, भंडारज, कारला भागात केळी, संत्र्याचे पीक घेतले जाते. काही प्रयोगशील शेतकºयांनी डाळिंबाचीसुद्धा लागवड आपल्या शेतात केली. तथापि, मागील पाच-सहा वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे पाणीपातळी खोल गेल्याने या पिकांना जगविण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे.
गजानन सुकळकर यांच्याकडे २४ एकर शेती आहे. त्यापैकी आठ एकरांत केळी व चार एकरांत डाळिंब हे फळपीक होते. पाणीपातळी खोल गेल्याने तिन्ही बोअरवेलचे पाणी आटले. त्यामुळे केळी व डाळिंबाची झाडे तोडण्याशिवाय सुकळकर यांच्यापुढे पर्याय नव्हता. या पिकासाठी घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याच्या जाणिवेतून त्यांनी २० जूनला सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. सुकळकर यांच्यावर सेंट्रल बँकेचे १० ते १२ लाख व खासगी सावकारांचे सात ते आठ लाख रुपयांचे कर्ज आहे. सावकारी कर्जासंबंधी प्रकरण सहायक निबंधकांकडे प्रविष्ट असल्याचे समजते.