उ. महाराष्ट्र, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या सुरूच
By admin | Published: September 26, 2015 03:05 AM2015-09-26T03:05:03+5:302015-09-26T03:05:03+5:30
शेतकरी आत्महत्यांचे सत्र उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थांबण्याची चिन्हे नाहीत. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जळगाव, बीड आणि उस्मानाबाद
जळगाव/उस्मानाबाद : शेतकरी आत्महत्यांचे सत्र उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थांबण्याची चिन्हे नाहीत. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जळगाव, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत चार शेतकऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत आत्महत्या केल्या आहेत.
जळगावातील पाथरी येथे सुनील जगन्नाथ जाधव (३९) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विषप्राशन करून जीवन संपविले. उस्मानाबाद जिल्ह्यातील वांगी (खु़) येथे शिवाजी विठ्ठल पवार या ५० वर्षीय शेतकऱ्याने शुक्रवारी पेटवून घेऊन आत्महत्या केली़ त्याच्याकडे अडीच एकर शेत आहे़ सततच्या दुष्काळामुळे पवार यांच्या हाती काहीच पडत नव्हते़
तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील ३२ वर्षीय आसाराम पंडित रडे या शेतकऱ्याने सिंदफणा नदीच्या पात्रात बंधाऱ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. रडे याच्याकडे बँकेचे कर्ज होते. केज तालुक्यातील पिठ्ठीघाट येथील रामेश्वर दशरथ ठोंबरे (३५) मामाच्या गावी दहीफळ वडमावली येथे गुरुवारी गेले होते. तेथे त्यांनी रात्री लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.