शेतकऱ्यांच्या आत्महत्या नक्कीच थांबतील
By admin | Published: September 11, 2016 03:49 AM2016-09-11T03:49:37+5:302016-09-11T03:49:37+5:30
पतंजली फूड आणि हर्बल पार्कमुळे शेतकऱ्यांना कृषी मालासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मध्यस्थांद्वारे लुबाडणूक न होता, त्यांच्या कृषिमालाला चांगली किंमत मिळेल.
नागपूर : पतंजली फूड आणि हर्बल पार्कमुळे शेतकऱ्यांना कृषी मालासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मध्यस्थांद्वारे लुबाडणूक न होता, त्यांच्या कृषिमालाला चांगली किंमत मिळेल. त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊन तो आत्महत्या करणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
मिहानमधील पतंजली फूड व हर्बल पार्कचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, योगगुरू बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, रामदास तडस, डॉ. विकास महात्मे, अजय संचेती, महापौर प्रवीण दटके उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘जगातील सर्वात मोठा फूड पार्क मिहानमध्ये साकार होणार आहे. या पार्कमध्ये कृषिमालावर आधारित प्रक्रिया उद्योग असल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार आहे. उसाप्रमाणेच विदर्भात मध्यस्थांची साखळी बंद होऊन शेतकऱ्यांच्या कृषिमालाला चांगली किंमत मिळेल. या पार्कच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ५० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. पतंजलीने शेतीचे क्लस्टर उभारावे,’ अशी मागणी त्यांनी केली.
विदर्भात ७५ टक्के जंगल आहे. या जंगलातील आदिवासींतर्फे उत्पादित वस्तू आणि अमरावती मेळघाट येथील जडीबुटी पतंजली खरेदी करणार आहे. विदर्भात शेतीपूरक रोजगार नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. या उद्योगामुळे गावातील युवकांना रोजगार मिळेल, असे गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)
तब्बल ५०० कोटींचा कृषी माल खरेदी करणार
विदर्भातील शेतकऱ्यांकडून १०० कोटींचा नव्हे, तर तब्बल ५०० कोटींचा कृषिमाल पतंजली खरेदी करणार आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पाच हजार कोटी रुपयांचा माल खरेदी करण्याचे आश्वासन बाबा रामदेव यांनी दिले. त्यामुळे विदर्भ आणि महाराष्ट्रात ‘अच्छे दिन येतील’ असे त्यांनी स्पष्ट केले.
क्लस्टर शेतीबाबत मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर रामदेव म्हणाले, महाराष्ट्रात पाच हजार एकर पडीक जमिनीवर क्लस्टर तयार करून आवळा, कोरफड आणि अन्य आयुर्वेदिक वनस्पतींचे पीक घेणार आहे. शेतकऱ्यांना २टक्के व्याजाने पैसा मिळेल. त्यांचा माल पतंजली खरेदी करण्यासह त्यांचे कर्जही परतफेडीच्या स्वरूपात पतंजलीतर्फे चुकते केले जाईल.
नियमांचे पालन करून जमीन
सरकारने बाबा रामदेव यांच्या फूड पार्कला नियमांचे पालन करून जमीन दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यासाठी सचिव स्तराच्या चार सदस्यांची समिती नेमली होती. २३० एकर जागेसाठी निविदा काढली, तेव्हा फक्त पतंजलीने निविदा भरली होती. दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढली, तेव्हासुद्धा एकमेव पतंजलीने निविदा भरली होती.
एकच गुंतवणूकदार पुढे आल्याने, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) तिसऱ्यांदा निविदा काढली. त्या वेळी पतंजलीव्यतिरिक्त कुणीही निविदा भरली नाही. त्यामुळे केंद्रीय दक्षतेच्या नियमानुसार पतंजलीला जागा देण्यात आली. कंपनीने जमिनीची किंमत निर्धारित रकमेपक्षा जास्त दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.