नगरच्या शेतकरी संपाचा राज्यभर वणवा पेटणार
By admin | Published: April 12, 2017 01:12 AM2017-04-12T01:12:42+5:302017-04-12T01:12:42+5:30
शेतकरी संपाच्या चळवळीला इतर जिल्ह्यातून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता नगरच्या शेतकरी संपाचा वणवा राज्यभर पेटण्याची चिन्हे आहेत़ घोंगडी बैठकांना
अहमदनगर : शेतकरी संपाच्या चळवळीला इतर जिल्ह्यातून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता नगरच्या शेतकरी संपाचा वणवा राज्यभर पेटण्याची चिन्हे आहेत़ घोंगडी बैठकांना वेग आला आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या ७०वर पोहोचली असून, शेजारच्या नाशिक, औरंगाबाद,
धुळे, नांदेड, परभणी, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकरी
त्यांच्या संपर्कात आहेत़ १ जून रोजीचा संप यशस्वी होईल, असा विश्वास कोअर कमिटीने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे़ वाढता उत्पादन खर्च आणि कोसळलेला शेतीमालाचा भाव, यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे़ आता संघटनांना बाजूला ठेवून शेतकऱ्यांनीच सरकारविरोधात लढा उभारला आहे़ राहाता तालुक्यातील पुणतांबा ग्रामपंचायतीच्या ३ एप्रिलच्या ग्रामसभेत संप करण्याचा ठराव शेतकऱ्यांनी केला़
ठिकठिकाणचे शेतकरी संपाचे नेतृत्व करणाऱ्या कोअर कमिटीशी संपर्क साधत आहेत़ नाशिक, धुळे, परभणी, बीड, सोलापूर, सांगली येथील शेतकऱ्यांनी विचारणा केली आहे़ नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे बुधवारी बैठक आहे़ ग्रामपंचायतींत २ मे रोजी ठराव करून ते तहसीलदारांना सादर केले जाणार आहेत, अशी माहिती सुहास वहाडणे, सर्जेराव जाधव, धनंजय जाधव, गणपत वाघ, डॉ़ धनंजय धनवटे यांनी दिली. (प्रतिनिधी)
राजू शेट्टी करणार शेतकऱ्यांशी चर्चा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी शुक्रवारी पुणतांबा गावात येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत़
तसेच रघुनाथ दादा पाटील, कृषक संघटनेच्या अध्यक्षा तथा श्रीरापूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक आणि नगर तालुक्यातील माजी खा. दादा पाटील शेळके यांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे.