हरितगृह शेती करण्याकडे विदर्भातील शेतक-यांचा कल!
By admin | Published: April 3, 2015 02:25 AM2015-04-03T02:25:53+5:302015-04-03T02:25:53+5:30
बुलडाणा जिल्हा बनले बिजोत्पादाचे जागतिक हब!
अकोला - संरक्षित शेती संकल्पनेला विदर्भातील शेतकर्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, पॉलीहाऊस-शेडनेट उभारणीकडे त्यांचा कल वाढला आहे. जगातील सर्वच नामवंत बियाणे कंपन्या बुलडाणा जिलतील देऊळगावराजा येथे शेडनेटमधून बिजोत्पादनाचा कार्यक्रम घेत असल्याने या गावाचे नाव आंतराराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.
देशात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बुलडाणा जिलतील देऊळगावराजा या दोनच ठिकाणी भाजीपाला, मिरची व वेलवर्गीय भाज्यांच्या बिजोत्पादनाचा कार्यक्रम शेडनेट, पॉलीहाउसमधून घेण्यात येत आहे. सुरुवातीला कर्नाटकातील राणी बिन्नोर येथेच शेडनेटमध्ये बिजोत्पादन घेतले जात होते. तथापि, देऊळगावराजा येथील शेतकर्यांनी या बिजोत्पादन कार्यक्रमाचे नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्यानंतर शेडनेटमध्ये बिजोत्पादन घेणारे देऊळगावराजा हे देशातील दुसरे केंद्र बनले. या भागात संकरित टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, वेलवर्गीय भाजीपाला, काकडी आदी सर्वच प्रकारच्या भाजीपाला पिकांचे बिजोत्पादन केले जाते. या भागातील वातावरण बिजोत्पादनासाठी पोषक असल्याने या क्षेत्रामध्ये कार्यरत जगातील बहुतांश कंपन्यांनी देऊळगावराजात पाय रोवले आहेत. या शेतकर्यांना दहा गुंठा क्षेत्रात बिजोत्पादन घेण्यासाठी दोन लाख रुपये मिळत असल्याने या भागात शेडनेट शेतीचा चांगलाच विस्तार झाला आहे.
बिजोत्पादनाचे काम कौशल्यआधारित असल्याने शेतकर्यांना प्रशिक्षणाची गरज भासते. सध्या राज्यात पुणे येथे शेतकर्यांना पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. ही सोय प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामार्फत केल्यास शेतकर्यांना सोयीचे होईल. शेडनेट शेतीसाठी शासनाकडून पूरक अनुदानाची गरज शेतकर्यांनी अधोरेखित केली आहे. शासनाकडून देण्यात येणार्या अनुदानात मजबूत शेडनेट घालता येत नाही. दुसरीकडे ज्या कंपन्या येथे बिजोत्पादन घेतात, त्या शेडनेट उभारण्यासाठी शेतकर्यांना सुरुवातीला ५0 हजारांपर्यंत रक्कम उपलब्ध करतात. दरम्यान, बुलडाणा कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकर्यांना यासंबधीची प्राथमिक माहिती दिली जात आहे. तथापि, परिपूर्ण प्रशिक्षणाची गरज शेतकर्यांना आहे. त्यासंबंधी प्रयत्न सुरू असून, निधी मिळवण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केले जाणार आहेत.