शेतकऱ्यांना धमकावलेच नाही, मनोरमा खेडकरांच्या वकिलांचा कोर्टात अजब दावा; वाचा सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 08:03 PM2024-07-18T20:03:14+5:302024-07-18T20:05:24+5:30
Manorama Khedkar : सरकारी वकील आणि मनोरमा खेडकरांच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केला, ते जाणून घ्या...
पुणे : आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात खेडकर कुटुंबाचे एकेक कारनामे उघड होऊ लागले होते. या प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी मनोरमा खेडकरांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मनोरमा खेडकर यांच्या वकिलांनी मनोरमा खेडकर यांचा शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडीओ न्यायाधीशांसमोर प्ले करून त्या शेतकऱ्यांना धमकावत नव्हत्या, असा अजब दावा केला आहे. तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मनोरमा खेडकर यांनी दिले आहे. दरम्यान, सरकारी वकील आणि मनोरमा खेडकरांच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केला, ते जाणून घ्या...
सरकारी वकिलांचा युक्तिवाद
मनोरमा खेडकर यांच्याकडून पिस्तूल जप्त करायचे आहे. मनोरमा खेडकर यांनी ज्या जमीनीवररुन वाद घातला त्या जमीनीची कागदपत्रे तपासायची आहेत. सकाळी सव्वा नऊ वाजता महाडमधून अटक केली आहे. पिस्तुल रिकव्हर करायचे आहे. गुन्ह्यात वापरलेली लँड क्रुझर गाडी ताब्यात घ्यायची आहे. आरोपी प्रभावशील व्यक्ती आहे. फिर्यादींवर दबाव आणू शकतात. इतर आरोपींना अटक करायची आहे. आरोपींची मुळशी तालुक्यात इतरही ठिकाणी मोठी जमीन आहे. या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना धमकावले आहे का याचा तपास करायचा आहे. त्यासाठी पोलीस कोठडी मिळावी. मिडीया रिपोर्टस पाहून व्हायरल व्हिडीओ पाहून खेडकर यांच्या विरोधात तक्रार देण्याचे बळ आले. म्हणून त्यांनी एक वर्षाने तक्रार दिली. फिर्यादी पासलकर यांच्यावर दबाव होता. म्हणून ते तक्रार देत नव्हते.
मनोरमा खेडकरांचे वकील काय म्हणाले?
आम्ही जमीन २००६ ला खरेदी केली आहे. पिस्तुलाचे लायसन्स आहे.आतापर्यंत आरोपीवर एक ही गुन्हा नाही. ३०७ कलम काल अचानक ॲड करण्यात आले आहे. त्याआधीचे सर्व सेक्शन बेलेबल आहेत. आम्ही तपासात सहकार्य करु. या प्रकरणी खेडकर यांच्या तक्ररीवरुन पासलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी तपास करुन चार्ज शीट दाखल केले आहे. असे, असताना एक वर्षाने पुन्हा त्याच घटनेत खेडकर यांना आरोपी करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टस पाहून एक वर्षाने तक्रार देण्यात आली आहे. एक वर्षाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे कारण ही पोलिसांनी दिलेले नाही. एक वर्षापूर्वी खेडकर यांनी या प्रकरणी पौड पोलीस स्टेशनला अर्ज दिला आहे. त्यांचे म्हणणे दिले आहे. २४ वर्षे खेडकर पिस्टल वापरत आहेत. मागील २४ वर्षात पिस्टलवरुन एक ही गुन्हा किंवा तक्रार नाही. आम्ही पिस्टल आणि लायसन्स सरेंडर करायला तयार आहोत. कोर्टाला मोबाईलवरील मनोरमा खेडकर यांचा व्हिडीओ दाखवला जात आहे. पासलकर यांचे आठ लोक घटनास्थळी उपस्थित होते, त्यामुळे त्यांनी पिस्टल हातात ठेवणे गैर नाही. घटनेच्या आदल्याच दिवशी खेडकर यांची गाडी आडवण्यात आली होती. त्यांना धमकावण्यात आले होते. आदल्या दिवशी खेडकर यांनी पौड पोलीस स्टेशनला तक्रार देखील दिली होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी पिस्टल बरोबर ठेवले होते.
तीन प्रकरणे मनोरमा यांना भोवली
आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना मुजोरीपणामुळे अनेक गोष्टींना उत्तर द्यावे लागले. त्यांची पुण्यातून वाशीमला बदली केली गेली. शिवाय मसुरीतून त्यांना प्रशिक्षण थांबवण्याची सूचना आली. हे सर्व घडत असताना मनोरमा यांचे एक एक कारनामे समोर येत होते. आपल्या मुलीची सरकारी चौकशी सुरु असताना मनोरमा अरेरावी करताना दिसून आल्या. अखेर एका मागोमाग मनोरमा यांचे तीन कारनामे व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले. त्यानंतर मनोरमा खेडकर या पसार झाल्या होत्या. पौड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्यांची शोधमोहीम सुरु केली. अखेर महाड मधून त्यांना अटक करण्यात आली. मनोरमा यांना तिन्ही व्हिडिओची प्रकरणे चांगलीच भोवली असल्याचे दिसून आले आहे.