स्वखर्चातून बंधारा बांधणारा शेतकरी शासनदरबारी उपेक्षित !
By Admin | Published: July 28, 2016 07:36 PM2016-07-28T19:36:40+5:302016-07-28T19:36:40+5:30
महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची प्रेरणा घेवून चार लाख रुपर्ये खर्च करीत बंधारा बांधणारा शेतकरी शासन दरबारी उपेक्षीतच आहे.
जळगाव जामोद : महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची प्रेरणा घेवून चार लाख रुपर्ये खर्च करीत बंधारा बांधणारा शेतकरी शासन दरबारी उपेक्षीतच आहे. शासन प्रशासनाने या शेतकऱ्याची काहीही दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम आसलगाव बाजार येथील शेतकरी उल्हास माहोदे यांनी स्वत: ४ लाख रूपये खर्च करून सिमेंट बंधारा बांधला. ज्यामध्ये आज मुबलक पाणी साठले व या शेतकऱ्यासह आजुबाजुच्या शेतकऱ्यांच्या विहिरींनाही त्याचा फायदा जाणवू लागला आहे.
केवळ ४ हेक्टर शेती असणाऱ्या या शेतकऱ्याने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी केलेला ह्या दिव्य प्रयत्नाने शेतकरी मात्र आर्थिकदृष्ट्या पुर्णत: खचून गेला आहे. दुसरीकडे जलयुक्त शिवार योजनेत कोट्यावधी रूपये खर्च होतात. त्या कामात गुणवत्ता दिसत नाही तरीही बिले काढली जातात. मात्र स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या शेतकऱ्यालाही सदर कामाचा प्रस्ताव पाठवून बांधकामाचे पैसे जलयुक्तमधून मिळाले असते तर निश्चितच अशा प्रेरणादायी शेतकऱ्याचा उत्साह वाढला असता. परंतु या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी, असा प्रयत्न प्रशासनाकडून झाला नाही, एवढे खरे.
आज रोजी पावसाने हा बंधारा तुडूंब भरला आहे. आसलगाव-धानोरा रस्त्यावर असलेला हा बंधारा अनेकांचे लक्ष वेधून घेतो. आणि इतरही शेतकरी या शेतकऱ्याची प्रेरणा घेवून जातात. लोकमतने याबाबत प्रसिध्दी दिल्यानंतर भरपूर शेतकऱ्यांनी या बंधाऱ्याला भेटी देवून माहोदेंचा उपक्रम जाणून घेतला. तर अनेकांनी प्रेरणा घेवून स्वयंप्रेरणेने कामेही केली.
या बंधाऱ्याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी माहोदे यांना मार्गदर्शन केले. व त्यांचा उत्साह वाढवला तर शेतकऱ्यांना प्रेरणादायी चित्रफीत बनविण्यासाठी प्रशासनाकडून चित्रीकरणही करून घेतले. परंतु अशाप्रकारे लाखो शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा शेतकरी मात्र आर्थिक मदतीपासून वंचीत राहिला आहे.
हा सिमेंट बंधारा मी स्वयंप्रेरणेने बांधला. पाणी टंचाईवर मात करता यावी त्यासाठी एवढे धाडस केले. अनेक शेतकऱ्यांनी भेटी देवून कामाची प्रेरणा घेतली. शासनाकडून आर्थिक मदत मिळाल्यास निश्चितच मला स्फुर्ती मिळेल व त्या निधीमधून सुध्दा असेच प्रेरणादायी काम करेल.
- उल्हास महादेवराव माहोदे,
शेतकरी आसलगाव बाजार.