सर्वाधिक तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांची चौकशी होणार !
By admin | Published: April 28, 2017 01:04 AM2017-04-28T01:04:25+5:302017-04-28T01:04:25+5:30
शासनाने काढला आदेश : पेरेपत्रकानुसार होणार तूर उत्पादनाची चौकशी
राजेश शेगोकार - अकोला
नोटबंदीनंतर दोन लाखापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार करणाऱ्या बँक खात्यांची ज्याप्रमाणे आयकर विभागाने चौकशी सुरू केली होती, तशाच प्रकारे आता सर्वाधिक तूर विकणाऱ्या शेतकऱ्याची चौकशी होणार आहे. आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीमध्ये ज्यांनी सर्वाधिक तूर विकली त्या पहिल्या एक हजार शेतकऱ्यांची यादी करून त्यांचे पेरेपत्रक, सात-बारा, याची एका आठवड्यात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. संबंधित शेतकऱ्याचे पेरेपत्रक व त्यानुसार अपेक्षित उत्पादन तसेच विकलेली तूर यामध्ये तफावत आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्याचेही निर्देश सहकार व पणन विभागाने २७ एप्रिल रोजी दिले आहेत. .
राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी राज्य शासनाकडून आता बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेनुसार २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर आवक होऊन नोंद झाली; मात्र खरेदी न करण्यात आलेली तूर खरेदीबाबत दिशानिर्देश देण्यात आले आहेत. राज्यात जवळपास १० लाख क्विंटल तूर खरेदीविना शिल्लक आहे. ही तूर खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व दि विदर्भ सहकारी पणन महासंघ नागपूर या संस्थांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही एजन्सी २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर आलेली तूरच खरेदी करणार आहे. केंद्र शासनाने प्रमाणित केलेल्या मापदंडानुसारच तूर खरेदी करताना संबंधित शेतकऱ्याचा सात-बारा व त्यावरील पीक पेरा तपासण्याचा आदेश देण्यात आला आहे. पीक पेरेपत्रकानुसार व कृषी विभागाने निश्चित केलेल्या हेक्टरी उत्पादनानुसार संबंधित शेतकऱ्याची तूर आहे का, याची खातरजमा झाल्यावरच तुरीची खरेदी होईल. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी यापूर्वी तूर कुठे कुठे विकली, याबाबत स्वयंघोषणापत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तूर कुठे विकली; शेतकऱ्यांना द्यावे लागेल स्वयंघोषणापत्र!
नाफेडमार्फत राबविण्यात आलेल्या तूर खरेदीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचीच तूर खरेदी केल्या गेल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीच समोर आल्या आहेत; मात्र आता या तक्रारींवर शासनाचे एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. सध्या मोजणीच्या प्रतीक्षेत असलेली तूर ही शेतकऱ्याचीच आहे, याची खात्री करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याचे पेरेपत्रक तपासल्या जाणार असून, यापूर्वी शेतकऱ्याने कुठे कुठे तूर विकली, याचे स्वयंघोषणापत्र दिल्यानंतर त्याच्या चौकशी अंतीच तूर खरेदी केली जाणार आहे.