शेतकरी होणार उद्योजक!
By admin | Published: January 11, 2015 02:36 AM2015-01-11T02:36:08+5:302015-01-11T02:36:08+5:30
शेअर बाजाराचा चढता निर्देशांक आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अशा विसंगत बातम्यांचा काळ आता लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.
स्थापन करा कृषी कंपनी : जागतिक बँकेने केला मदतीचा हात पुढे
राजरत्न शिरसाट - अकोला
शेअर बाजाराचा चढता निर्देशांक आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अशा विसंगत बातम्यांचा काळ आता लवकरच
संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. शेतीमालाची उत्पादकता आणि बाजारमूल्यांची सांगड घालून मुनाफा कमावण्याचे दिवस आता फार लांब राहिलेले नाहीत; कारण शेतकरीच आता उद्योजक बनणार आहेत!
शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा म्हणून आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांनी आता पणन मंडळाच्या माध्यमातून स्वत:च उद्योजक बनण्याचा मार्ग शोधला असून, त्यासाठी जागतिक बँकेने मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील शेतकरी गटाचे रूपांतर कंपन्यांमध्ये करण्यात येत असून, बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी शेतकरी गटाच्या कंपन्या स्थापन करण्यात येत आहेत. येत्या मार्चपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये १४१ शेतकरी कंपन्या स्थापन्याचे उद्दिष्ट पणन तज्ज्ञांना देण्यात आले असून, त्याविषयीचा आढावा कृषी विभागाच्या प्रधान सचिवांनी मंगळवारी पुण्यात घेतला आहे.
जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राज्यात पणन मंडळाकडून राबविण्यात
येत आहे. शेतकऱ्यांनी आता
बाजाराभिमुख पिके घ्यावीत, यासाठीचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद व पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील शेतकरी
गटाच्या कंपन्या उभारण्यासाठी नोंदणी करण्यात येत आहे.
मृत्यूचा फास नव्हे, समृद्धीचा ध्यास हवा
बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील शेतकरी गटाने ‘डोणगाव फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड’ या नावाने विदर्भातील पहिली शेतकरी कंपनी स्थापन केली. या कंपनीने बाजार व व्यवसायाभिमुख शेतीचे नियोजन केले आहे. या शेतकरी कंपनीमध्ये ११ संचालक असून, ३०० शेतकरी सभासद आहेत. या कंपनीला नोंदणी क्रमांक प्राप्त झाला आहे. पश्चिम विदर्भातील शेतकरी कंपन्यांची लवकरच नोंदणी होणार असून, याकरिता अकोला ८, बुलडाणा ८ आणि अमरावती जिल्ह्यातील १० शेतकरी कंपन्यांचे नोंदणी प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.
अशी स्थापन
करता येते कंपनी़़़
गावपातळीवरील १५ ते २० शेतकरी एकत्र येऊन गट स्थापन करू शकतात. या गटाची कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन केंद्र (आत्मा) अंतर्गत नोंदणी केली जाते. असे १५ ते २० शेतकरी गट एकत्र करू न शेतकरी उत्पादक कंपनी बनविली जाऊ शकते.
पाच ते सात गावं मिळून देखील शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली जाऊ शकते. शेतमाल थेट गावातून विकला जावा, गावागावात शेतकऱ्यांचे प्रक्रिया उद्योग उभे राहावेत, हा यामागचा उद्देश आहे.
कंपनी कायदा १९५६ अन्वये शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील शेतकरी कंपन्यांची नोंदणी पुणे येथील नोंदणी कार्यालयात, तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये शेतकरी कंपन्यांची नोंदणी मुंबईतील नोंदणी कार्यालयात केली जाते.
कंपनीचे
फायदे काय ?
सामूहिकरीत्या शेतीचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविणे, तसेच बाजार संपर्क व शेतमालाच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांना नफा मिळू शकतो. शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा कमी पैशात मिळतात. शेतकरी कंपनीमार्फत विविध कृषीवर आधारित व्यवसाय सुरू करण्यात येतात़ यातून मिळणारा नफा व लाभांश शेतकरी सभासदांना विभागून मिळू शकतो.
महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्पांतर्गत नाबार्ड या कंपन्यांना अर्थसाहाय्य देत असून, खासगी कंपन्यांप्रमाणे या कंपन्यांचे काम चालणार आहे. नाबार्ड किंवा राष्ट्रीयीकृत, जिल्हा बँका या कंपन्यांना कर्ज देणार आहेत. त्यामुळे शेतकरी कंपनीतील सभासदांना बँकेकडे जाण्याची गरजच राहणार नाही. शेतकरी कंपनी शेतकरी सभासदांना कर्ज उपलब्ध करू न देऊ शकते.
शेतकरी कंपन्यांना कृषी सेवा केंदे्र सुरू करता येतील. खासगी कंपन्यांशी करार करू न शेतमाल विक्री करता येईल. शेतमाल ठेवण्यासाठी शीतगृहे उभारता येतील.
६५ हजार शेतकरी गट
या शेतकरी गटांच्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पणन मंडळ, आत्मा व खासगी कंपन्यांचा सहभाग वाढविण्यात आला आहे. या कंपन्यांना प्रोत्साहन मिळावे व भांडवलाची गरज पूर्ण व्हावी, याकरिता राज्याच्या कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यात आतापर्यंत ६५ हजार शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून, हे उद्दिष्ट एक लाख गटांपर्यंत नेण्याचा संकल्प आहे.
आजवरच्या पद्धतींचे काय झाले ?
करार शेती : या पद्धतीत कंपनी (उदा. पेप्सी, मॅक्डॉनल्ड) शेतकऱ्यांशी तीन-चार वर्षांचा करार करून विशिष्ट शेती उत्पादन (उदा. बटाटे, संत्रा, द्राक्षे, मका) थेट विकत घेतात. शेतीमालाचा भाव निश्चित केला जातो. मात्र या पद्धतीत शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
गटशेती पद्धत : एखाद्या गावातील काही शेतकरी एकत्र येऊन एकच पीक घेतात. त्यामुळे त्या पिकाचे क्षेत्र वाढून उत्पादनही वाढते. शिवाय योग्य बाजारभाव मिळतो. मात्र एकत्र आलेल्या शेतकऱ्यांपैकी एक शेतकरी बाजूला झाला तरी ही पद्धत मोडीत निघते.
सामूहिक शेती : संपूर्ण गावातील शेतकरी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने शेती करतात. त्यामुळे श्रम, पैसा व वेळ वाचतो. योग्य बाजारपेठेपर्यंत शेतीमाल पोहोचविता येतो. मात्र कोणती पिके घ्यावयाची, उत्पन्नाचे वाटप कसे करावयाचे, यावर सर्र्व गावकऱ्यांचे एकमत होणे कठीणच.
विदर्भातील पहिल्या शेतकरी कंपनीची नोंदणी आम्ही केली असून, बियाणे निर्मिती, खते, बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करू न देणे, तसेच प्रक्रिया उद्योग उभे करण्याचा मानस आहे. निर्यातक्षम शेतमाल उत्पादन घेण्यावर भर देण्यात येणार असून, शेतमालाच्या निर्यातीवर लक्ष के ंद्रित करण्यात आले आहे. सहकार आणि कंपनी यांची सांगड घालून ही कंपनी काम करणार आहे.
- गजानन आखडे, अध्यक्ष, डोणगाव फार्मर प्रोड्युसर कंपनी, डोणगाव, ता. मेहकर, जि.बुलडाणा.
येत्या मार्चपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये १४१ कंपन्या स्थापण्याचे उद्दिष्ट आहे. विदर्भातील शेतकरी कंपन्यांच्या नोंदणीकरिता प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
- प्रशांत चासकर, कृषी पणनतज्ज्ञ, अकोला.