कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी कंपन्या करणार खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 02:09 AM2018-12-11T02:09:54+5:302018-12-11T02:10:12+5:30
महा-एफपीसीचा पुढाकार : २ महिन्यांत ५ हजार टन कांदा खरेदीचा संकल्प
पुणे : कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी रस्त्यावर माल टाकून देऊ लागले आहेत. त्यामुळे कांद्याचे कोसळणारे दर रोखण्यासाठी शेतकरी कृषी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेतला असून, येत्या दोन महिन्यांत ५ हजार टन कांदा खरेदी करण्याचा संकल्प त्यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत सोडला. त्यामुळे, बळीराजाच्या मदतीला बळीराजानेच स्थापन केलेल्या कंपन्या धावून आल्याचे चित्र आहे.
गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारातील कांद्याचे भाव कोसळत आहेत. काही ठिकाणी अगदी ५ रुपये किलोपर्यंत बाजार भाव आहेत. सोमवारी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रतवारीनुसार क्विंटलमागे ४०० ते ११०० रुपयांचा भाव मिळाला. कांद्याला भाव मिळत नसल्याने मोफत कांदा वाटपाचे आंदोलनही शेतकऱ्यांनी केले. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक सोमवारी पुण्यात झाली. त्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कांदा खरेदी करुन तो कांदा लागवड कमी असलेल्या अथवा नसलेल्या ठिकाणी विकावा असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महा-एफपीसीच्या वतीने देण्यात आली.
महाराष्ट्र पणन मंडळाच्या मदतीने व्यापार प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्यातील बाजारपेठांमध्ये शेतकºयांच्या बांधावरुन थेट बाजारात कांद्याची विक्री होईल. तसेच काज्यात २५ हजार टन क्षमतेचे साठवणूक केंद्र उभारले जाईल. त्यामुळे उन्हाळ््यात देखील कांद्याचे दर टिकवता येतील. राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने कांद्याची उत्पादकता घटून उत्पादन कमी होणार आहे. आंध्र प्रदेशातील कांदा अवक कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
डिसेंबर महिनाअखेरीस येथील कांदा आवक थांबेल. तर, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील आवक जानेवारी महिनाअखेरीस कमी होते. या दरम्यान दक्षिण आणि उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाबी लक्षात घेऊन शेतकºयांनी नियोजन करावे, असे आवाहन महा-एफपीसीतर्फे करण्यात आले आहे.
आंतरराज्य व्यापारासाठी विक्री साखळी
शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने कांद्याच्या आंतरराज्य व्यापारासाठी विक्री साखळी उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अहमदनगर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद आणि बीड येथे खरेदी केंद्रे सुरु करण्यात येतील. त्यानंतर कांदा उत्पादन नसणाºया राज्यांत त्याची विक्री केली जाईल. चेन्नई येथे दक्षिण भारतातील व्यापार केंद्र सुरु करण्यात आले असून, घाऊक बाजार अणि संस्थात्मक खरेदीसाठी व्यापार सुरू करण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यांत ५ हजार टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट आहे. आंतरराज्य व्यापाराला चालना देण्यासाठी वाहतूक आणि साठवणुकीचे अनुदान देण्यात येणार आहे.