शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष : जेवढा हिस्सा तेवढाच लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 06:49 AM2024-12-12T06:49:00+5:302024-12-12T06:49:18+5:30
आतापर्यंत जो शेतकरी सेवा संस्थेला सभासद आहे, त्याच्या उताऱ्यावर जेवढे क्षेत्र आहे, तेच विचारात घेऊन त्याला पीक कर्ज मंजूर केले जात होते; परंतु तरीही ‘नाबार्ड’ने पीक कर्ज वाटपाचे निकष बदलले आहेत.
- विश्वास पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ८अ या शेतजमिनीच्या मालकी उताऱ्यावर तुमच्या वाट्याला जेवढे क्षेत्र असेल तेवढ्याच क्षेत्राचे पीक कर्ज तुम्हाला यावर्षीपासून मिळणार आहे. त्यामुळे गावपातळीवरील सेवा सोसायट्यांतून प्रत्येकाचे ‘८अ’ जमा करण्याची मोहीम जिल्ह्यात जोरात सुरू आहे. ‘८अ’चा निकष लावल्याने शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज कमी होणार आहे. कारण, बहुतांश शेतकरी असे आहेत की त्यांच्या ८अ वर एकत्रित कुटुंबातील सर्वांची नावे आहेत. ती हक्कसोडपत्र केल्याशिवाय कमी होणार नाहीत.
आतापर्यंत जो शेतकरी सेवा संस्थेला सभासद आहे, त्याच्या उताऱ्यावर जेवढे क्षेत्र आहे, तेच विचारात घेऊन त्याला पीक कर्ज मंजूर केले जात होते; परंतु तरीही ‘नाबार्ड’ने पीक कर्ज वाटपाचे निकष बदलले आहेत. त्यानुसार यावर्षीपासून पीक कर्ज वाटप होणार आहे. एकत्र कुटुंबपद्धतीत कुटुंबातील कर्त्यापुरुषाचे निधन झाल्यावर त्याच्या वारसांची नावे शेतजमिनीला वारसा हक्काने लागतात. पीक कर्ज देताना सेवा संस्थेला जो सभासद आहे, त्याच्या नावावर त्या ‘८अ’वरील सर्वच क्षेत्र विचारात घेऊन पीक कर्ज वाटप केले जात होते. आता तसे होणार नाही. समजा एका शेतकऱ्याला ३ एकर म्हणजे १२० गुंठे क्षेत्र असेल आणि त्याचे निधन झाल्यावर पत्नी, दोन मुले, चार बहिणी, असे वारस असतील तर शेतकरी असलेल्या भावाच्या वाट्याला फक्त १७ गुंठेच जमीन येऊ शकते. त्यामुळे त्याला तेवढ्याच क्षेत्राचे पीक कर्ज मिळेल.
भांडणे लावणार निकष...
वारसा हक्काने शेतजमिनीला लागलेली बहिणी, पत्नी यांची नावे कमी करायची झाल्यास त्यांचे हक्कसोडपत्र करावे लागेल.
पूर्वी काही वेळा त्यांचे संमतीपत्र घेऊन पीक कर्ज मंजूर केले जात होते; परंतु आता ते अजिबात चालणार नाही, अशी बँकेची नोटीस सेवा संस्थांकडून लावण्यात आली आहे.
त्यामुळे आता अनेक कुटुंबांत कमालीचे वाद सुरू आहेत. त्या अर्थाने ‘नाबार्ड’चा नवा निकष घरोघरी भांडणे लावणारा असल्याच्या टीका होत आहेत.
कर्ज वाटपाची पद्धत बदलल्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहेच, शिवाय सेवा संस्थांचे व्यवहारही कमी होतील. संस्था कशा चालवायच्या, असा प्रसंग येऊ शकतो. शेतकऱ्याला हक्काचे गरजेला दीड-दोन लाख रुपये पीक कर्ज मिळायचे, त्यातही आता अडचणी येणार आहेत.
-शिवाजीराव पाटील, संस्थापक,
पांडुरंग सेवा संस्था, आरे, ता. करवीर
पीक कर्ज वसुलीत कोल्हापूर जिल्हा कायमच अग्रेसर आहे. कोल्हापूरचा शेतकरी पीक कर्ज, पाणीपट्टी, वीज बिले नियमित भरतो. असे असताना ‘नाबार्ड’ने निश्चित केलेली नवीन पीक कर्ज वाटप पद्धती शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारी आहे. त्याविरोधात सर्वांनीच आवाज उठवण्याची गरज आहे.
-उत्तम विलास पाटील,
शेतकरी, बोरगाव, ता. पन्हाळा