शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय जागा घेऊ देणार नाही
By admin | Published: December 21, 2015 12:17 AM2015-12-21T00:17:40+5:302015-12-21T00:17:40+5:30
चाकण येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यासाठी एक इंचही जमीन शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय घेऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी दिला
राजगुरुनगर : चाकण येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यासाठी एक इंचही जमीन शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय घेऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी दिला.
चाकणजवळच्या ६ गावांच्या जमिनी घेण्याऐवजी सेझ प्रकल्पातील सेझबाधितांच्या परताव्याच्या जमिनी आणि सेझच्या अविकसित जमिनी एमआयडीसीसाठी आजच्या दराने घ्याव्यात, अशी मागणी ही शेट्टी यांनी केली. खेड तालुका आधीच प्रकल्पग्रस्त तालुका झाला आहे. जवळपास ८ हजार एकर जमिनी संपादित झाल्या आहेत. पाचव्या टप्प्यासाठी सध्याच्या प्रस्तावित जमिनी बागायती आहेत. विमानतळाकरिता प्रस्तावित आणि भामा आसखेड धरणाच्या कालव्यांसाठी व लाभक्षेत्रासाठी राखून ठेवलेल्या म्हणून ज्या जमिनीवर १३ वर्षांपासून शिक्के मारून ठेवले आणि शेतकऱ्यांना विकासापासून वंचित ठेवले; त्याच जमिनी आता एमआयडीसीकरिता घेण्यास निघाले आहेत. त्यासाठी खेड तालुक्यात मोठे जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. (वार्ताहर)