शेतजमीन कमी होणारच आहे, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 10:23 IST2025-03-30T10:23:05+5:302025-03-30T10:23:12+5:30
Agriculture News: कृषी क्षेत्राखालील जमीन कमी होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. उद्योग, सेवा क्षेत्र, रस्ते, बंदरे, विमानतळ, धरणे, सौरऊर्जा प्रकल्प आदी जमिनीशिवाय विकसित होऊ शकत नाहीत.

शेतजमीन कमी होणारच आहे, पण...
- नानासाहेब पाटील
(निवृत्त सनदी अधिकारी)
लीकडेच लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात देशातील शेतजमीन कमी होत असल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सांगितले. त्यात महाराष्ट्रातील शेतीक्षेत्र लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. महाराष्ट्रात किंवा इतर राज्यांत कृषी क्षेत्राखालील जमीन कमी होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. उद्योग, सेवा क्षेत्र, रस्ते, बंदरे, विमानतळ, धरणे, सौर ऊर्जा प्रकल्प, आदी जमिनीशिवाय विकसित होऊ शकत नाहीत. भारत हा जगातील अत्यंत वेगाने विकसित होणारा देश आहे. त्यात महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले राज्य आहे. राज्यात रस्ते, रेल्वे, धरणे या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात जमीन लागणार आहे. मात्र, आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत शेतजमीन घेताना योग्य मोबदला दिला पाहिजे, तसेच या क्षेत्रातील मनुष्यबळाला रोजगार निर्मिती करून इतर क्षेत्रांत सामावून घेतले पाहिजे.
आर्थिक विकास हा कृषी, उद्योग, सेवा क्षेत्र व अलीकडच्या काळातील डिजिटल सोयींवर आधारित आहे. सर्वसाधारणपणे आर्थिक विकास होत असताना उद्योग व सेवा क्षेत्र विकसित होतात. या प्रक्रियेमध्ये कृषी क्षेत्रातील मनुष्यबळ हे त्यात सामावून घेतले जाते. आर्थिक विकासात शहरीकरण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरांमध्ये शिक्षण व कौशल्य निर्मितीची साधने असतात. तेथेच संशोधन व तांत्रिक विकास होतो. अलीकडच्या १५० वर्षांत असे दिसून आले आहे की, बंदरे व शहरे ही विकासाची मूळ केंद्रे आहेत. आशियाई वाघ म्हणून गणले जाणारे सिंगापूर, दक्षिण कोरियासह चीन, जपानमध्ये शहर व बंदरे यांच्या माध्यमातून आर्थिक विकासाचा पाया रचला गेला. कोणताही अविकसित देश विकासाच्या पहिल्या टप्प्यामध्ये देशांतर्गत उपभोग्य वस्तूंच्या निर्मितीतून विकास करू शकत नाही, त्यासाठी निर्यात हा एक पर्याय आहे. यासाठी परदेशी भांडवल व तंत्रज्ञान अत्यंत आवश्यक असते.
कृषी क्षेत्राची उत्पादकता व पर्यायाने उत्पन्न तयार करण्याची क्षमता मर्यादित आहे. जगातील कोणताही देश फक्त कृषी क्षेत्रावर श्रीमंत झालेला नाही. बऱ्याच वेळा कॅलिफोर्नियाचे उदाहरण दिले जाते. कॅलिफोर्नियात शेतीवर फक्त २ टक्के शेतकरी व शेतमजूर अवलंबून आहेत. कॅलिफोर्नियाचे उत्पन्न हे प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान, हॉलिवूड व पर्यटन क्षेत्र आहे. जगात सर्वांत मोठ्या माहिती तंत्रज्ञानाच्या संस्था कॅलिफोर्नियात आहेत. गुगल, अमेझॉन व ॲपलचे बाजारपेठेतील मूल्य हे काही देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा जास्त आहे. कॅलिफोर्निया स्वतंत्र राष्ट्र असते तर जगातील तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचे राष्ट्र ठरले असते. एखाद्या देशामध्ये कृषी क्षेत्र कमी होणे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. आपण चिंता केली पाहिजे ती हे मनुष्यबळ कृषी क्षेत्रातून उद्योग व सेवा क्षेत्रात कसे सामावून घेतले जाते. भारताच्या विकास प्रक्रियेतील एक मोठी उणीव म्हणजे उद्योग, सेवा क्षेत्रांची वाढ झाली, परंतु त्या गतीने रोजगार निर्मिती झाली नाही.
चायना शॉक
चीनने एवढी अभूतपूर्व प्रगती केली आहे की, भारतच नव्हे अमेरिका व युरोप खंडालाही आर्थिक आव्हान निर्माण केले आहे. ‘चायना शॉक’ असे त्यास म्हणतात. औद्योगिक उत्पादनात चीनची मक्तेदारी तयार झाली आहे. त्यांच्या स्पर्धेला कोणी उभे राहू शकत नाही. त्यामुळे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरुद्ध मोठी आर्थिक आघाडी उघडली आहे. युरोपमध्ये चीनची उत्पादने मोठ्या प्रमाणात आयात केली जातात, त्यामुळे तेथील देशांतर्गत उद्योग जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या देशांत स्थानिक मजुरांना काम नाही. चीनने आपले सर्व हिरावून घेतले आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. सध्या तरी चीनच्या या आर्थिक प्रगतीच्या आव्हानापुढे नजीकच्या भविष्यात भारत काही करू शकेल, अशी शक्यता नाही. त्यामुळे भारतातील रोजगार निर्मिती व कृषी क्षेत्राचा भार कमी करणे ही प्रक्रिया अतिशय अवघड आहे, हे समजून घेणे नियोजनाचा महत्त्वाचा भाग आहे.