फरासखाना बॉम्बस्फोट तपास फाईल बंद
By admin | Published: June 27, 2017 10:30 PM2017-06-27T22:30:26+5:302017-06-27T22:30:51+5:30
पाच संशयित दहशतवाद्यांचा भोपाळ आणि तेलंगणामध्ये झालेल्या चकमकीदरम्यान मृत्यू झाल्याने एटीएसने न्यायालयामध्ये खटला बंद करण्यासंदर्भात अंतिम अहवाल सादर केला होता
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 27 - फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवून आणून संपूर्ण देशात दहशत माजविणाऱ्या सिमीच्या पाच संशयित दहशतवाद्यांचा भोपाळ आणि तेलंगणामध्ये झालेल्या चकमकीदरम्यान मृत्यू झाल्याने एटीएसने न्यायालयामध्ये खटला बंद करण्यासंदर्भात अंतिम अहवाल सादर केला होता. न्यायालयाने हा अहवाल मान्य करीत खटला बंद करण्यास मंजुरी दिली आहे.
शेख मेहबूब शेख इस्माइल ऊर्फ गुड्डू ऊर्फ किसन ऊर्फ मलिक समीर ऊर्फ आफताब (रा. गणेश तलाई, खंडवा, मध्य प्रदेश), जाकीर हुसेन बदुल हुसेन ऊर्फ सिद्दिक ऊर्फ आनंद ऊर्फ विकी डॉन ऊर्फ विनयकुमार (रा. खंडवा, मध्य प्रदेश), अमजदखान ऊर्फ पप्पू ऊर्फ दाऊद रमजान खान (रा. खंडवा, मध्य प्रदेश) हे तिघे भोपाळ येथील चकमकीत नोव्हेंबर २०१६ ठार झाले होते. तर मोहम्मद एजाजुद्दीन उर्फ एजाज उर्फ रियाज उर्फ राहुल (वय ३२, रा़ करेली, मध्य प्रदेश), त्याचा साथीदार मोहम्मद अस्लम अयुब खान (वय २८) नलगौंडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ठार झाला होता़ सिमी संघटनेच्या आठ अतिरेक्यांनी भोपाळच्या मध्यवर्ती तुरुंगातील एका सुरक्षारक्षकाला ठार मारून पलायन केले होते़ त्यानंतर मध्यप्रदेश पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत त्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका प्रचारकावर गोळीबार केल्याच्या गुन्ह्यात हे पाचही दहशतवादी खांडवा कारागृहात बंद होते. तेथून पसार झाल्यानंतर त्यांनी राहणीमानात बदल केला होता. एजाजुद्दीन आणि अस्लम या दोघांनी खांडवा कारागृहामधून १ आॅक्टोबर २०१३ रोजी पलायन केले होते. त्यांच्यासोबत डॉ. अबू फैजल इम्रान, मेहबुब उर्फ गुड्डु इस्माईल खान, अमजद रमजान खान, झाकीर हुसेन उर्फ सादीक उर्फ विकी डॉन उर्फ विनयकुमार बद्रुल हुसेन हे चौघेही होते. पळून गेल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच डॉ. अबू फौजलला अटक करण्यात आली होती. हे सर्व संशयीत सिमी सिमी आणि इंडीयन मुजाहीदीनचे हे सर्वजण डेडीकेटेड दहशतवादी होते. खांडव्यामधून पसार झाल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात १० जुलै २०१४ रोजी बॉम्बस्फोट घडवला होता. त्यासाठी सातारच्या न्यायालयामधून एका पोलिसाची दुचाकी चोरण्यात आली होती. या दुचाकीच्या डिक्कीमध्ये बॉम्ब पेरुन ही दुचाकी पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आली होती.
दहशतवादी हल्ल्याचा कायमस्वरुपी धोका असलेल्या दगडुशेठ मंदिराच्या अगदी जवळच हा स्फोट झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहीले होते. फरासखाना बॉम्बस्फोट घडविल्यानंतर हे संशयीत दक्षिणेत पळाले होते. एटीएसने त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवादी पुण्यात घुसण्यापासून ते कोल्हापुरला पळून जाईपर्यंतच्या काही मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. या सीसीटीव्हीमधून एजाजुद्दीनसह अन्य दहशतवाद्यांचे स्पष्ट फुटेज पोलिसांना मिळाले होते. एटीएसने राज्यभर या दहशतवाद्यांची छायाचित्र असलेली पत्रके आणि पोस्टर्स वाटली होती.
फरासखान्याचा स्फोट घडवल्यानंतर फरारी झालेल्या या दहशतवाद्यांनी बिजनौरमध्ये वास्तव्य केले होते. तेथे घरामध्ये बॉम्ब तयार करीत असताना प्रेशर कुकरचा स्फोट झाला होता. या घटनेत मेहबूब गुड्डू भाजला होता, अशी माहिती एटीएसकडे आहे. पोलिसांना त्याठिकाणी बनावट मतदान पत्रिका, स्फोटक साहित्य मिळून आले होते़ तेथे सापडलेल्या साहित्याचे मिळतेजुळते साहित्य फरासखाना बॉम्बस्फोटात वापरल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पसार झालेले दहशतवादी उत्तर प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगालमध्ये फिरत होते. त्यांचे शेवटचे लोकेशन कर्नाटकातील होसेपेटे येथे मिळाले होते. हे सर्व दहशतवादी हैदराबादमध्ये लपल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. आंध्र प्रदेश पोलिसांसोबत नालगोंडा जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत एजाजुद्दीन आणि मोहम्मद अस्लम या दोघांना कंठस्थान घालण्यात आले होते. त्यांचे साथीदार अमजद, सादिक आणि मोहम्मद सलिक फरार झाले होते.
कालांतराने उर्वरीत तीन दहशतवादी मध्यप्रदेश पोलिसांच्या हाती लागले. भोपाळ येथील कारागृहामध्ये असताना त्यांनी एका पोलिसांचा खून करुन पलायन केले होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा माग काढला. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणातील पाच दहशतवादी ठार झाल्याने पुढे तपास कसा करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. यासोबतच दोषारोपपत्रही पाठविण्यात येणे शक्य नव्हते. त्यामुळे एटीएसने शिवाजीनगर न्यायालयात या खटल्याचा अॅबेटेड समरी रिपोर्ट सादर केला होता. हा रिपोर्ट न्यायालयाने मान्य केला असून खटला बंद करण्यात आला आहे.