कर्जमाफी करा म्हणण्याची फॅशन - व्यंकय्या नायडू
By admin | Published: June 22, 2017 12:28 PM2017-06-22T12:28:07+5:302017-06-22T16:12:10+5:30
अलीकडे कर्ज घेतल्यानंतर लगेच कर्जमाफी करा, असे म्हणण्याची फॅशन आली आहे. बँकेतील पैसा हा जनतेचा आहे याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - अलीकडे कर्ज घेतल्यानंतर लगेच कर्जमाफी करा, असे म्हणण्याची फॅशन आली आहे. बँकेतील पैसा हा जनतेचा आहे याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी केली. मात्र केवळ संकटकाळात कर्जमाफीच्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो, असे नायडू यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या कर्जरोख्यांची नोंदणी गुरुवारी मुंबई शेअर बाजारात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन गेहलोत, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते.
यावेळी व्यंकय्या नायडू असेही म्हणाले, "कर्ज घेतले की लगेच कर्ज माफीची मागणी केली जात आहे. मात्र स्वावलंबी बनले पाहिजे. अमेरिकेने मोफत कर्ज दिले तर आपण घेणार का. आता मोफत देण्याचा जमाना गेला आहे. निवडणुकीपूर्वी टीव्ही, मिक्सर, मंगळसूत्र देण्याची घोषणा केली जाते. मात्र ते लहान मुलांना लॉलीपॉप दाखवल्यासारखे आहे."
आता शहरात पायाभूत सुविधा प्रकल्प उभे करण्यासाठी शहरांनीच निधी उभा करणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेने घेतलेल्या कर्जरोख्यांमुळे विकासाचा नवा मार्ग खुला झाला आहे,असे व्यकंय्या नायडू यांनी सांगितले.
शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यासाठी पुढील ५ वर्षात २३०० कोटी रुपये पुणे महापालिका कर्जरोख्यांद्वारे उभारणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून २०० कोटी रुपये गुरुवारी कर्ज रोख्यातून उभारण्यात आले आहेत. यानिमित्ताने मुंबई शेअर बाजारात झालेल्या कर्ज रोख्यांची नोंदणी करण्याच्या कार्यक्रमाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी, केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव राजीव गौबा, राज्याचे प्रधान सचिव सुमित मलिक, अतिरिक्त सचिव प्रवीणसिंह परदेशी, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान, आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.