नेहरूंविरोधात बोलण्याची फॅशन
By Admin | Published: March 13, 2016 04:53 AM2016-03-13T04:53:38+5:302016-03-13T04:53:38+5:30
पंडित जवाहरलाल नेहरू यांना समजून न घेताच त्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा प्रकार सध्या देशात सुरू झाला असून, हा प्रकार चिंताजनक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहसचिव माधवराव गोडबोले
औरंगाबाद : पंडित जवाहरलाल नेहरू यांना समजून न घेताच त्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा प्रकार सध्या देशात सुरू झाला असून, हा प्रकार चिंताजनक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहसचिव माधवराव गोडबोले यांनी शनिवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या विशेष वाङ्मय पुरस्कार प्रदान कार्यक्रमात केले.
साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या दोन विशेष पुरस्कारांचे वितरण प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विलास खोले यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार माधवराव गोडबोले यांना त्यांच्या ‘जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व : एक सिंहावलोकन’ या ग्रंथासाठी, तर रंगभूमीच्या लक्षणीय कामगिरीसाठी देण्यात येणारा नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार लातूरचे श्रीराम गोजमगुंडे यांना प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते.
मी काही इंदिरा गांधी, नेहरू अथवा काँग्रेसचा भक्त नाही; परंतु ज्यांनी नेहरू वाचले नाही, समजून घेतले नाही, अशा व्यक्ती दिमाखात त्यांच्या विरोधात बोलतात. जणू नेहरू यांच्या कार्याविषयी बोलण्याची फॅशनच आली आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीविषयी बोलताना अभ्यासपूर्ण बोलायला हवे, असे सांगून गोडबोले म्हणाले, आज हिंदूराष्ट्र संकल्पनेवर बोलले जाते. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहरू नसते तर सर्वधर्म समभावच देशात दिसला नसता. आज जी काही विविध विषयांवर मतप्रदर्शने होत आहेत, ती अभ्यासपूर्ण नाहीत.
आपण साडेतीन वर्षांहून अधिक काळ यशवंतराव चव्हाण यांच्यासोबतही काम केले. स्वातंत्र्यानंतर देशाला मिळालेले ते सर्वाेत्तम गृहमंत्री होते, असेही ते म्हणाले. मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सागर व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होती. (प्रतिनिधी)