वेगवान ‘टॅल्गो’ ट्रेन आज मुंबईत
By admin | Published: August 2, 2016 05:52 AM2016-08-02T05:52:24+5:302016-08-02T05:52:24+5:30
मुंबई ते दिल्लीदरम्यानच्या रेल्वे प्रवासाचा कालावधी लवकरच काही तासांनी कमी होणार आहे.
मुंबई : मुंबई ते दिल्लीदरम्यानच्या रेल्वे प्रवासाचा कालावधी लवकरच काही तासांनी कमी होणार आहे. या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान अशी ‘टॅल्गो’ ट्रेन सुरू केली जाणार असून, तिची सध्या चाचणी केली जात आहे. दोन मार्गांवर यशस्वी चाचणी झाल्यानंतर या ट्रेनची चाचणी सोमवारी रात्री दिल्ली ते मुंबई अशी घेतली जाईल. ही ट्रेन ताशी १३0 किलोमीटच्या वेगाने धावून १३ ते १४ तासांत पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल येथे मंगळवारी सकाळी दाखल
होईल. जवळपास ४५ कोटी
रुपये किंमत असलेली ही ट्रेन सुपरफास्ट राजधानीपेक्षाही अधिक वेगवान असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
मुंबई ते अहमदाबादबरोबरच मुंबई ते दिल्लीदरम्यानही मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाददरम्यानचे प्रवास अंतर कमी करण्यासाठी बुलेट ट्रेनचे नियोजन केले जात असतानाच मुंबई ते दिल्लीदरम्यानचे प्रवास अंतरही कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुंबई ते दिल्लीदरम्यान वेगवान टॅल्गो ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने मे महिन्यात उत्तर प्रदेशातील बरेली ते मोरादाबाद येथे पहिली चाचणी केली होती. त्यानंतर दुसरी चाचणी उत्तर मध्य रेल्वेच्या मथुरा ते पलवल मार्गावर चाचणी घेण्यात आली. या दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई या लांब पल्ल्याच्या मार्गावर चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी दिल्ली येथून टॅल्गो ट्रेन मुंबईसाठी रवाना केली जाईल आणि मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास मुंबई सेंट्रल येथे दाखल होईल.
दिल्ली ते मुंबईदरम्यान १ ते ५ आॅगस्टपर्यंत तीन चाचण्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे. यात पहिली चाचणी झाल्यानंतर दुसरी चाचणी ३ आॅगस्ट आणि अंतिम चाचणी ५ आॅगस्टला होणार आहे. अंतिम चाचणीवेळी या ट्रेनचा वेग ताशी १५0 किलोमीटर एवढा असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
सध्या दिल्ली ते मुंबई हे अंतर कापण्यासाठी सुपरफास्ट राजधानी एक्स्प्रेसला १६ तास लागतात. या ट्रेनमुळे दोन शहरांमधील अंतर आणखी कमी होईल. (प्रतिनिधी)
>या ट्रेनच्या चाचणीवेळी आरडीएसओचे (रिसर्च, डिझाईन अॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन) व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते तसेच स्पेन येथून आलेले अभियंतेही असतील. राजधानी एक्स्प्रेस ज्या मार्गांवरून धावते त्याच मार्गांवरुन ही ट्रेन धावेल आणि काही स्थानकांवर त्या ट्रेनला थांबाही देण्यात येणार आहे. ही ट्रेन नऊ डब्यांची आहे. प्रत्येक डब्याची किंमत ही ५ कोटी रुपये आहे. स्पेनमधील एका कंपनीकडून ही ट्रेन भारतीय रेल्वेला
उपलब्ध झाली आहे. जास्तीतजास्त ताशी २00 ते २२0चा वेग
अॅल्युमिनियमचे डबे
ट्रेन धावताना डबे अत्यंत कमी प्रमाणात व्हायब्रेट होतील.
३0 टक्के कमी ऊर्जा या ट्रेनला लागेल.
आगीपासून बचाव होईल.