एक हजार गावांत तीव्र पाणीटंचाई
By admin | Published: September 11, 2015 03:09 AM2015-09-11T03:09:44+5:302015-09-11T03:09:44+5:30
मराठवाड्यातील एक हजारांहून अधिक गावे आणि २० मोठ्या शहरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. विभागात सुमारे चौदाशे टँकर धावत असून, १० मोठी धरणे आणि ३ बंधाऱ्यांमध्ये
औरंगाबाद : मराठवाड्यातील एक हजारांहून अधिक गावे आणि २० मोठ्या शहरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. विभागात सुमारे चौदाशे टँकर धावत असून, १० मोठी धरणे आणि ३ बंधाऱ्यांमध्ये मिळून ८.५ टक्के इतकाच पाणीसाठी उपलब्ध आहे.
जायकवाडीसारख्या मोठ्या धरणात केवळ ४.१३ टक्के तर, नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरणात ७.७ टक्के एवढेच पाणी आहे. अनेक प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदा जून अािण जुलै महिन्यांत संपूर्ण मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने आठही जिल्ह्यांत जुलै महिन्यापासूनच पाणीटंचाई आहे. सप्टेंबर महिन्यात औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत चार दिवस बरा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला. पण यामुळे पाण्याचे संकट मात्र टळलेले नाही. औरंगाबाद शहरातही चार दिवसांआड पाणी येत आहे. जिल्ह्यातील १२२ गावांत तीव्र पाणीटंचाई असून, १५३ टँकर चालू आहेत.
अनेक प्रकल्प कोरडेठाक
चार दिवसांपासून काही जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला असला तरी अनेक पाझर तलाव आणि मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा (बीड) निम्न तेरणा (उस्मानाबाद) या चार धरणांत सद्य:स्थितीला उपयुक्त जलसाठा शून्य असून, सीना कोळेगाव (उस्मानाबाद) या बंधाऱ्यातही शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. विष्णुपुरी धरणात २० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे.
बीड जिल्ह्यात भीषण स्थिती
अवर्षणप्रवण असलेल्या बीड जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांपासून पाण्याची मोठी कमतरता होती. यंदा मात्र स्थिती भीषण आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक ५९२ टँकर चालू करण्यात आले आहेत. तरीही अनेक गावे अद्यापही तहानलेली आहेत.