शिक्षकांचा वेतनासाठी उपोषणाचा इशारा
By admin | Published: January 16, 2017 02:13 AM2017-01-16T02:13:12+5:302017-01-16T02:13:12+5:30
मुंबईतील शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतले नसल्याने शिक्षकवर्गाला वेतनापासून वंचित राहावे लागत आहे
मुंबई : मुंबईतील शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतले नसल्याने शिक्षकवर्गाला वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत शिक्षण आयुक्तांनी शिक्षण निरिक्षक कार्यालयांना वेतन सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र तरीही प्रशासनाकडून चालढकल सुरू असल्याने शिक्षक परिषदेने उपोषणाचा इशारा दिला आहे.
शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, अतिरिक्त शिक्षकांना शाळांनी सामावून न घेतल्याने दोन महिन्यांपासून बहुतेक शिक्षक वेतनापासून वंचित असून, त्यांच्या कुटुंबाचीही उपासमार होत आहे. या प्रकरणी शिक्षण आयुक्तांनी शिक्षण निरीक्षक कार्यालयांना वेतन सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र शिक्षण निरीक्षक कार्यालयांकडून चालढकल सुरू आहे. याबाबत शिक्षक परिषदेने शिक्षण आयुक्त व शिक्षण निरीक्षकांना पत्र लिहून शिक्षकांना तत्काळ वेतन अदा करण्याची मागणी केली आहे.
याआधी ५ जानेवारी २०१७ रोजी शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व वेतन पथकाच्या अधीक्षकांना याबाबत आदेश दिले आहेत. त्यात अतिरिक्त शिक्षकांचे वेतन न थांबविता तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये याबाबत कार्यवाही सुरू करून वेतनही सुरू केले आहे.
मात्र मुंबईत शिक्षण निरीक्षकांनी केवळ नावाला सुनावणी घेऊन कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. (प्रतिनिधी)