माळहिवरा शिवारात भरधाव पिकअपने भाविकांना उडवले; चार ठार तर ४ जण जखमी
By विजय पाटील | Published: February 24, 2024 08:46 AM2024-02-24T08:46:07+5:302024-02-24T08:46:26+5:30
अपघातातील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अपघातानंतर पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येतंय.
हिंगोली - जिल्ह्यातील हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा शिवारात भरधाव पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार तर ४ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दि . .२४ सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयत व जखमी सिरसम (ता. हिंगोली) येथील रहिवासी आहेत. जखमींवर हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील भाविक दर शनिवारी सिरसम येथून पायी माळहिवरा फाटा येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी येतात. नेहमी प्रमाणे हे भाविक आज पहाटेच सिरसम येथून माळहिवरा येथे पायी निघाले होते. सर्व भाविक माळहिवरा शिवारात आले असतांना हिंगोलीकडून अमरावतीकडे भाजीपाल्याचे रिकामे कॅरेट घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून धडक दिली.
या अपघातात मनोज गोपाळराव इंगळे (३९), बालाजी बाबुराव इंगळे (३२), सतीष शंकरराव थोरात (२७), वैभव नंदू कामखेडे (२२) यांचा मृत्यू झाला तर जगन प्रल्हाद अडकिणे, उत्तम संतोष गिरी, संतोष सिताराम वसु, राजकुमार भिकाजी घाटोळकर (सर्व रा. सिरसम) हे जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तसेच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड, जमादार अनिल डुकरे, आकाश पंडीतकर, किशोर पवार पथकाने सर्वांना हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयात डॉ. मनिष बगडीया, डॉ. नंदकिशोर करवा, डॉ. नितीन पुरोहित यांच्या पथकाने आजारी रुग्णांवर तातडीने उपचार सुरु केले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अपघातानंतर पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे.