जीवघेणा खेळ: पालकांनो, ‘ब्ल्यू व्हेल’पासून मुलांना सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 05:15 AM2017-08-01T05:15:56+5:302017-08-01T05:16:01+5:30
गेमिंगचे तुफान वेड असणारा वर्ग सोशल मीडियामध्ये आहेच. यापूर्वी ‘कँडी क्रश’, ‘पोकेमन गो’ आणि ‘अँग्री बर्ड’चे सोशल माध्यमांतील वेड प्रसिद्ध आहे.
मुंबई : गेमिंगचे तुफान वेड असणारा वर्ग सोशल मीडियामध्ये आहेच. यापूर्वी ‘कँडी क्रश’, ‘पोकेमन गो’ आणि ‘अँग्री बर्ड’चे सोशल माध्यमांतील वेड प्रसिद्ध आहे. आता मात्र या फळीत नव्या गेमने ‘एन्ट्री’ केली आहे. परदेशात जम बसवून आता आपल्याकडे घुसलेला ‘ब्ल्यू व्हेल’ हा आॅनलाइन गेम जीवघेणा ठरु शकतो. अंधेरीतील १४ वर्षीय मुलाने या गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. शिवाय, २०१३ साली रशियात दाखल झालेल्या या गेममुळे आतापर्यंत जगभरात १३० जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे वेळीच याचे गांभीर्य ओळखून पालकांनी मुला-मुलींकडे लक्ष देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
‘ब्ल्यू व्हेल’ या गेममध्ये मुला-मुलींना सोशल मीडियावरून संपर्क करण्यात येतो. त्यांना ५० दिवसांमध्ये काही कामे करण्यास सांगण्यात येतात. यामध्ये कुटुंब व मित्रांशी संपूर्ण संबंध तोडणे, स्वत:ला इजा करून घेणे यांचा समावेश आहे. याचे चित्रण गेमच्या क्युरेटरला पाठवावे लागते, जेणेकरून दिलेले आव्हान पूर्ण होण्याची खात्री होते. अखेर पर्यवेक्षक सहभागींना आत्महत्या करण्याचे आव्हान देतो. गेम डाउनलोड केला की, तो डिलिट होत नाही. वापरकर्त्याची वैयक्तिक माहितीदेखील हॅक होण्याची शक्यता असते.
पालकांनो हे कराच...-
मुले कोणता गेम खेळतात, याकडे लक्ष द्या.
त्यांच्याशी संवाद साधा, समजून घ्या.
मुला-मुलींना ओरडण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवा.
मित्र-मैत्रिणींच्या दबावाखाली कोणतीही गोष्ट करण्यापासून रोखा.
चांगले आणि वाईट काय, हे त्यांच्या वयाचे होऊन समजेल अशा भाषेत सांगा.
गेम टास्क-
हातावर ब्लेडने ब्ल्यू व्हेलचे चित्र रेखाटणे
हाताच्या नसा कापणे
ओठांवर ब्लेडने कापणे
पहाटे एखाद्या उंच ठिकाणी जाणे
पहाटे उठून हातावर वार करणे
हॉरर चित्रपट पाहणे
गच्चीवरून उडी मारणे
सोशल मीडियापासून
दूर ठेवण्यासाठी मैदानी खेळ, एकत्रित सहल,
गेट-टुगेदर अशा गोष्टी करा.
गेमवरच बंदी घाला-
ब्ल्यू व्हेल असो वा असे इतर गेम्स, यावर त्वरित प्रतिबंध आणणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणांनी आणि पालकांनीही याचे गांभीर्य ओळखले पाहिजे. मात्र, मुला-मुलींना वा तरुणपिढीला या गेमिंगपासून दूर ठेवताना हे लक्षात घेतले पाहिजे की, गेमिंग थांबविले की, त्यांना अस्वस्थ वाटू लागणार. त्यामुळे त्यांची अस्वस्थता ओळखून त्यांना समूजन घेणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. या कालावधीत १०० टक्के मुला-मुलींकडे, तरुणपिढीकडे लक्ष दिले पाहिजे. सोशल मीडियावर सर्फिंग करताना मुले नेमकी काय करतात, याची माहिती पालकांना असलीच पाहिजे. त्याचप्रमाणे, आपल्या पाल्याच्या मित्र-मैत्रिणींकडेही पालकांनी लक्ष दिले पाहिजे.
- डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार विभाग प्रमुख, केईएम रुग्णालय