जीवघेणा उन्माद

By admin | Published: January 16, 2015 01:06 AM2015-01-16T01:06:01+5:302015-01-16T01:06:01+5:30

मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प आणि आनंदाची देवाणघेवाण केली जात असताना या सणाच्या नावाखाली आज दिवसभर सुरू असलेल्या पतंगबाजीच्या

Fatal Mania | जीवघेणा उन्माद

जीवघेणा उन्माद

Next

पोलीस कुठे गेले ? : नायलॉन मांजाची धडाक्यात विक्री
नागपूर : मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प आणि आनंदाची देवाणघेवाण केली जात असताना या सणाच्या नावाखाली आज दिवसभर सुरू असलेल्या पतंगबाजीच्या उन्मादाने दोघांचा नाहक बळी गेला. दिवसभरात ५० वर नागरिक आणि मुले जखमी झाली. आपल्या संस्कृतीचा आनंद साजरा करताना दुसऱ्याचा बळी घेणे किंवा जखमी करणे हे कुठेही सांगितलेले नाही. पण तरीही गुरुवारी दिवसभर हे पतंगबाज रस्त्यांवर, घराच्या छतांवर अक्षरश: धुमाकूळ घालत होते. यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी संतप्त भावना या घटनेतून पोळलेल्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. पतंगबाजांचा हा उन्माद आणि मस्ती उतरविण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज आहे. तसेच त्यांना रस्त्यावर झोडपून काढण्यासाठी सामाजिक संघटनांच्या पुढाकाराची तेवढीच गरज आहे.
प्रशासनाचा पुढाकार नाही
नायलॉन मांजाच्या धोका हा केवळ एका शहरापुरताच मर्यादित नसून राज्यातील अनेक शहरांतील नागरिकांच्या जीवावर यामुळे बेतू शकते. लोकप्रतिनिधी व प्रशासनासोबतच सरकारने स्वत:हून यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैवाने असे होताना दिसून येत नाही. लोकप्रतिनिधी हे चारचाकीशिवाय प्रवासच करीत नसल्याने त्यांना या धोक्याची कल्पनादेखील येत नाही. एरवी लहानसहान प्रकरणांत मोठी आंदोलने करणाऱ्या नेत्यांना रस्त्यांवरील हा मृत्यूचा धोका दिसत नाही का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
दुचाकीस्वारांनी घेतला धसका
घरांचे छत व मैदानांवरचा ‘ओ काट’ चा खेळ आता चक्क रस्त्यांवरच रंगू लागल्याने कोणत्याही क्षणी रस्त्यावर आडव्या येणाऱ्या मांजाच्या रूपाने कोणत्याही क्षणी काळाची झडप वाहनचालकांवर बसू शकते. संक्रांतीच्या दिवशी याचे प्रत्यंतर नागरिकांना आले आहे. शहरातील निरनिराळ्या भागात दुचाकीस्वार अक्षरश: जीव मुठीत घेऊन वाहने चालवित होते. अनेक वाहनचालकांसमोर मांजामुळे अडचणी आल्या. विशेषत: महाल, इतवारी, मानेवाडा, गोपालनगर, चुनाभट्टी, जरीपटका, रेशीमबाग, मेडिकल मार्ग, सक्करदरा या भागांमध्ये तर अनेक नागरिकांना मांजाचा फटका बसला. काही नागरिक तर गळ्याभोवती रुमाल, स्कार्फ किंवा मफलर गुंडाळून दुचाकी चालवित होते.
‘लोकमत’ची भूमिका
मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंगबाजीच्या नावावर जो उन्माद उपराजधानीत सुरू होता तो चीड आणणारा आहे. या पतंगबाजीमुळे ज्यांचा बळी गेला किंवा जे जखमी झाले, त्यांचे झालेले नुकसान कोणीही भरून काढू शकत नाही. आमचा पतंग उडविण्याला विरोध नाही. पतंग उडवीत असताना नायलॉनचा मांजा, काचेचा चुरा वापरणे, ‘डीजे’चा धुमाकूळ या गोष्टींना आमचा विरोध आहे. ‘लोकमत’ची हीच भूमिका आहे. हा उन्माद असणाऱ्यांना आमचा विरोध आहे आणि ही विकृती थांबविण्यासाठी सामाजिक संघटना व नागरिकांनी समोर येऊन पुढाकार घेण्याची गरज आहे.
‘डीजे’चा धांगडधिंगा
पतंगबाजांनी संक्रांतीच्या सणाला अक्षरश: बीभत्स स्वरूप देण्यास सुरुवात केली आहे. घराच्या छतांवर ‘डीजे’ किंवा ‘म्युझिक सिस्टीम’ लावून अक्षरश: कानठळ्या वाजवणाऱ्या आवाजात गाणी लावली जातात. यामुळे परिसरातील वृद्ध नागरिक, विद्यार्थी, रुग्ण यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. याशिवाय घोळक्याने धांगडधिंगा करीत असताना मुलींची छेडखानी करणे, घाणेरड्या कमेन्टस् करणे, आरोळ्या ठोकणे असे प्रकारदेखील होत असतात. यासंदर्भातदेखील पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नाही.
मेडिकलमध्ये २५ जणांवर उपचार
आज सकाळपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) धारदार मांजामुळे कान, नाक, ओठ, मान, हात तर कुणाचा पाय कापलेल्या रुग्णांनी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत अशा २५ जणांवर उपचार करण्यात आले. यात रस्त्यावर अचानक आडवा आलेला मांजा आणि पतंगीमुळे किरकोळ जखमी झालेल्या रुग्णांची संख्या मोठी होती पतंगीच्या नादात तिसऱ्या मजल्यावरून एक युवक तर एक ११ वर्षाची मुलगी पहिल्या मजल्यावरून खाली पडून जखमी झाली.
मेयोमध्ये ११ जण
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) मांजामुळे गंभीर जखमी झालेल्या ११ जणांवर उपचार करण्यात आले. यातील ५ जण किरकोळ जखमी तर ७ जणांना टाके लावण्यात आल्याची माहिती आहे. अपघात विभागात यांच्यावर उपचार करून सुटी देण्यात आली. शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी इस्पितळांमध्येही अनेकांनी उपचार घेतल्याची माहिती आहे.

Web Title: Fatal Mania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.