९०० विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
By admin | Published: May 25, 2015 04:02 AM2015-05-25T04:02:53+5:302015-05-25T04:02:53+5:30
खेरवाडी येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील दुसऱ्या सत्रातील ९०० विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या सत्रातील २२५ प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना २०१०-२०११ पासून अतिरिक्त कामांचे सुमारे
मनोहर कुंभेजकर, मुंबई
खेरवाडी येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील दुसऱ्या सत्रातील ९०० विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या सत्रातील २२५ प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना २०१०-२०११ पासून अतिरिक्त कामांचे सुमारे २.२५ कोटी वेतन मिळालेले नाही. प्राचार्य डॉ.एच.पी.चासकर आणि प्रशासकीय अधिकारी पी.पी.वाणी यांच्यामुळे हे वेतन रखडले असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. तर वेतनापोटी आलेले सुमारे ७५ ते ९५ लाखांचे अनुदान आणि २०१४-१५ मधील १ कोटी १८ लाख रुपये प्राचार्यांच्या हलगर्जीपणामुळे परत गेले. त्यामुळे प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, या असंतोषामुळे दुसरे सत्र बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संस्थेतील प्रथम सत्रासह सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतनदेखील विलंबाने होत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लक्ष घालून देय असलेले अनुदान आणि थकीत वेतन देण्याची विनंती उपप्राचार्य प्रा. राजेंद्रकुमार बऱ्हाटे यांनी केली आहे. तसेच येथून इतर ठिकाणी बदली झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची थकबाकी नवीन आस्थापनांवर प्रदान करण्याची कोणतीही तरतूद सध्या राज्यात अस्तित्वात नसल्याचेही बऱ्हाटे यांनी सांगितले. संस्थेच्या कार्यालयातील धुरी या महिला कर्मचाऱ्याचे वेतन सात महिने रोखून धरले होते.