तारा भवाळकर यांचा सत्कार, वेळ, मधुशाला वगैरे ...
By Admin | Published: January 22, 2017 01:16 AM2017-01-22T01:16:35+5:302017-01-22T01:16:35+5:30
मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघात सातत्याने होणाऱ्या कार्यक्रमांमुळे सांस्कृतिक वातावरण जागतं राहतं. अशापैकीच एक कार्यक्रम म्हणजे, महाराष्ट्र सेवा संघाचा सुं. ल. गद्रे साहित्यिक पुरस्कार.
- रविप्रकाश कुलकर्णी
मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघात सातत्याने होणाऱ्या कार्यक्रमांमुळे सांस्कृतिक वातावरण जागतं राहतं. अशापैकीच एक कार्यक्रम म्हणजे, महाराष्ट्र सेवा संघाचा सुं. ल. गद्रे साहित्यिक पुरस्कार. दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण लेखन करणाऱ्या एका लेखकाची वा लेखिकेची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. यापूर्वी २३ पुरस्कार दिले गेले. यंदाचे त्यांचे २४वे वर्ष. त्या पुरस्करासाठी त्यांनी एरवी पटकन लक्षात येत नाही, अशा लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोकपरंपरांच्या अभ्यासिका - लेखिका तारा भवाळकर यांची निवड केली. यावरून सुं.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार देताना, त्यांची निवड समिती किती चोखंदळ आहे, हे दिसते.
महाराष्ट्र सेवा संघाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचे कार्यक्रम वेळेत सुरू होतात. त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर ठळकपणे- ‘कार्यक्रम वेळेवर सुरू होईल’ याची कृपया नोंद घ्यावी, असे लिहिलेले असते. मात्र, यंदा पुरस्कार लाभलेल्या तारा भवाळकर, त्यांची मुलाखत घेणारे मुुकुंद कुळे आणि प्रमुख पाहुण मधु मंगेश कर्णिक हे तिघेही वेळेआधीच उपस्थित होते, पण रसिकांची पुरेशी उपस्थिती नसल्यामुळे कार्यक्रम उशिरा सुरू झाला. कारण काहीही असतील, पण संघाने कार्यक्रम वेळेवर सुरू करण्याची प्रथा मोडू नये. कार्यकर्ता मंडळी या विचारांशी सहमत होवोत आणि यापुढे वेळेत कार्यक्रम सुरू होईल, या सूचनेशी एकनिष्ठ राहतील, अशी अपेक्षा करतो.
लोकसाहित्यातील कामगिरीसाठी तारा भवाळकर ख्यात आहेत. त्यासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाला मी गेलो होतो. आणखी एक कारण होतं, त्यांनी कधी काळी हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाळा’चं मराठी भाषांतर केलेले आहे. आज मधुशालाचं मराठी भाषांतर किमान ५-७ जणांनी तरी नक्कीच केलं आहे, पण तारा भवाळकर या त्यातल्या पहिल्या असाव्यात. त्या संबंधात त्यांच्याकडून जाणून घ्यावे, हा विचार होता.
मुकुंद कुळे यांनी तारा भवाळकरांना त्यांच्या लोकसाहित्य, लोकपरंपरांसंदर्भात चांगलं सविस्तर बोलकं केलं. त्यांना शेवटचा प्रश्न केला, तो मधुशाळा संदर्भात. तारा भवाळकरांनी शाळा कॉलेजच्या दिवसातच हा संग्रह अनुवादित केला होता. तो दहा वर्षे तसाच पडून राहिला, मग पुढे त्यांना प्रकाशक मिळाला! हे ऐकल्यावर मात्र ठरवलं कार्यक्रमानंतर तारा भवाळकरांशी बोलायलाच हवं. काही प्रश्न मी करताच त्या म्हणाल्या, ‘इंद्रायणी साहित्याचे दयार्णव कोपर्डेकर यांना घेऊन इंडिया बुक हाउसचे बल्लाळ माझ्याकडे काहीतरी पुस्तक द्या म्हणून आले आणि मी दिलं.’ हे पुस्तक यथावकाश आउट आॅफ प्रिन्ट झालं. इंडिया बुक हाउस आता अस्तित्वात नाही. मग आता तारा भवाळकर हे नाव प्रस्थापित झालं असताना, मधुशालाची नवीन आवृत्ती का काढत नाही? असं मी विचारताच, त्या म्हणतात, ‘अनुवादाची परवानगी! त्या वेळी हरिवंशराय बच्चन यांनी परवानगी दिली होती, पण आता ते गेले. मग परवानगी मागायचा सव्यापसव्य कोण करणार? कुणी प्रकाशकानेच ते करावं.’
मला वाटतं, हरिवंशराय बच्चन यांनी काय फक्त एका आवृत्तीच्या अनुवादाची परवानगी दिली असेल का? ते पाहायला हवे. मात्र, कुणा प्रकाशकाने लक्ष घातले तर ते अवघड ठरू नये. हे लक्ष वेधण्यासाठीच लिहिले आहे.