भाजपचे 'ते' साडे तीन लोक तुरुंगात जाणार; दोघांची नावं समजली, खुद्द राऊतांनी इशाऱ्यातून सांगितली?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 09:02 AM2022-02-16T09:02:46+5:302022-02-16T09:07:57+5:30
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे ट्विटमधून महत्त्वाचे संकेत; दोघांचा अप्रत्यक्ष उल्लेख
मुंबई: हमने बहुत बरदाश्त किया है ना.. तो बरबाद भी हम ही करेंगे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला परवा रोखठोक इशारा दिला. पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक कोठडीत असतील, असंदेखील राऊत म्हणाले. काल राऊत यांनी साडे तीन लोकांची नावं सांगितली नाहीत. मात्र आज सकाळीच राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे मोठे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे साडे तीनमधील दोन नेत्यांची नावं समोर आली आहेत.
'बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch!कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!', असं ट्विट राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी या बाप बेट्यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण संजय राऊत या ट्विटमधून भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांबद्दल बोलत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काल शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी सर्वाधिक शाब्दिक हल्ले आणि आरोप सोमय्या पिता-पुत्रांवरच केले होते. सोमय्यांचा उल्लेख तर राऊत यांनी 'मुलुंडचा दलाल' असा केला होता.
बाप बेटे जेल मधे जाणार!
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 16, 2022
Wait and watch!
कोठडीचे sanitization सुरू आहे..
जय महाराष्ट्र!
सोमय्यांबद्दल काय म्हणाले राऊत?
भाजपाचेकिरीट सोमय्या ईडीचे दलाल आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो की कुणाच्या घरावर धाडी पडणार, अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात बसून दही-खिचडी खात असतो, असा दावाही संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच सध्या फक्त ट्रेलर आहे, पुढील काळात काही व्हिडीओ समोर आणणार, असा इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी केला.
नील सोमय्यांबद्दल काय बोलले राऊत?
पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा पार्टनर आहे. त्या राकेश वाधवान यांना भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी सोमय्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी त्यातून पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलगा निल सोमय्या यांना अटक करा असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं होतं.
साडेतीन नेत्यांबद्दल काय म्हणाले होते राऊत?
तुरुंगात जाणारे भाजपचे ते साडेतीन लोक कोण? अशी विचारणा शिवसेना भवनातून बाहेर पडताना काल पत्रकारांनी राऊतांकडे केली होती. त्यावर ते लोक कोण हे उद्यापासून कळेल आणि ते आत गेल्यावर मोजत बसा असं उत्तर राऊत यांनी दिलं. त्याआधी शिवसेना भवनातील पत्रकार परिषद संपून राऊत खुर्चीवरून उठतानाही त्यांना हा प्रश्न विचारला गेला. तेव्हा ते साडे तीन लोक आहेत. त्यातला कोणी अर्धा आहे, कोणी पाव आहे, तर कोणी चार आण्याचा असल्याचं विधान राऊत यांनी केलं.