बापरे ! भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी थकवलं अडीच लाखांचं वीजबिल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 06:08 PM2017-08-12T18:08:14+5:302017-08-12T18:39:34+5:30
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आता नवीन वादात अडकले आहेत. रावसाहेब दानवे यांनी तब्बल 83 महिन्यांचे वीजबिलच भरले नसल्याचे वृत्त समोर आले आहे.
मुंबई, दि. 12 - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आता नवीन वादात अडकले आहेत. दानवेंनी महावितरणचे तब्बल अडीच लाख रुपयांचे वीजबिल थकवले आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, दानवेंचे भोकरदनमधील घराचे गेल्या 83 महिन्यांपासूनचं वीजबिल थकलेले आहे. विशेष म्हणजे महावितरणनंही अद्यापपर्यंत दानवेंवर कोणतीही कारवाई केलेली नाही.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये घर आहे. गेल्या 83 महिन्यांपासून महावितरणचे तब्बल 2 लाख 59 हजार 176 रुपयांचे वीजबिल दानवेंनी थकवले आहे. फक्त जुलै महिन्यातच दानवेंकडे 29 हजार 595 हजारांची थकबाकी आहे.
83 महिन्यांपासून दानवेंची लाखोंची थकबाकी असूनही कोणतीही कारवाई न केल्यामुळे महावितरणच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्यांनी जर वीजबिल भरले नाही तर महावितरण तातडीनं त्यांची वीजजोडणी कापते.
रावसाहेब दानवे आणि त्यांचे वाद
तूर खरेदीवरुन दानवेंचं वादग्रस्त विधान
यापूर्वी तूरडाळ खरेदीवरुन शेतक-यांप्रती असभ्य भाषा वापरल्याप्रकरणी रावसाहेब दानवे अडचणीत आले होते. एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात 'साले', असं म्हणत रावसाहेब दानवेंनी शेतक-यांची एक प्रकारे अवहेलना केली होती. जालन्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले होते की, ''इतकी तूर खरेदी करूनही यांचे रडगाणे सुरूच आहे, दर नाही दर नाही असली रडगाणी आता बंद करा.'' कापूस, तूर आणि डाळीला भाव नाही असली रडगाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली होती. यावेळी भाजपाच्या एका कार्यकर्त्यानं दानवेंना तूर खरेदीबाबत लोकांना काय उत्तर द्यायचं असा प्रश्न केला असता त्याला प्रत्युत्तर देताना दानवेंची जीभ घसरली. राज्य सरकारनं एक लाख टन तूर खरेदी केली तरी लोक रडतात साले, असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यावरच आगपाखड केली होती. याआधीही रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.
नोटाबंदी केल्यानंतर दानवे म्हणाले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर सर्वांना धक्का बसला. मात्र, तुमच्याकडे नोटा असतील तर माझ्याकडे द्या, मी बदलून देतो आणि आपल्याजवळ कुठे नोटा बंद आहेत?. तसेच गेल्या वर्षी अख्ख्या मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, मात्र आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो की, खूप दुष्काळ आहे. माणसं स्थलांतर करत आहेत, जनावरं मरत आहेत आणि हे खोटे चित्र उभे आम्ही करत होतो. याचा परिणाम असा झाला की 68 वर्षांत पहिल्यांदा 4200 कोटींची मदत मिळाली, असं धक्कादायक वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं होतं. पैठणमधील एका प्रचारसभेत बोलताना रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा, असंही वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वीच रावसाहेब दानवेंनी विरोधकांना उद्देशूनही बेजबाबदार विधान केलं होतं. कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावं आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असं दानवे म्हणाले होते.