बाप रे... १२३ कोटींची एफआरपी थकीत!
By admin | Published: October 22, 2016 01:47 AM2016-10-22T01:47:51+5:302016-10-22T01:47:51+5:30
अगामी ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना, गेल्या वर्षीच्या हंगामातील २० साखर कारखान्यांनी तब्बल १२३ कोटी रुपये ऊस
पुणे : अगामी ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना, गेल्या वर्षीच्या हंगामातील २० साखर कारखान्यांनी तब्बल १२३ कोटी रुपये ऊस उत्पादकांना अजूनही दिलेले नाहीत. तर गेल्या दोन हंगामांत ३६ कारखान्यांनी सुमारे २२८ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले नसल्याने त्यांच्यावर साखर आयुक्तालयाने कारवाई केली आहे.
आगामी ऊस गाळप हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एफआरपी न दिलेल्या साखर कारखान्यांकडून वसुलीसाठी साखर आयुक्तालयाकडून तगादा सुरू आहे. गेल्या हंगामात १७७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. त्यातून तब्बल ७४२.९४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यापोटी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना किफायतशीर व रास्त दरापोटी (एफआरपी) १६ हजार ४७२ कोटी रुपये देणे अपेक्षित होते. परंतु १६ हजार ३८३ कोटी रुपयेच शेतकऱ्यांना मिळाले आहेत. अजूनही २० साखर कारखान्यांकडे १२३ कोटी रुपये शिल्लक आहेत.
गेल्या हंगामातील १३ कारखान्यांनावर एफआरपीची रक्कम न दिल्याने रेव्हेन्यू अॅण्ड रिकव्हरी सर्टिफिकेटची (आरआरसी) कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडे तब्बल १६५ कोटी रुपयांची थकबाकी होती.
त्यातील ९५ कोटी रुपयांची वसुली झाली असून, ७० कोटी रुपये शिल्लक आहेत. त्याचबरोबर २०१४-१५मधील २३ साखर कारखान्यांकडे ३१३ कोटी रुपये थकीत असल्याने, त्यांच्यावरही आरआरसीची कारवाई करण्यात आली होती. त्यातील १५४ कोटी रुपये वसूल करण्यात साखर आयुक्तालयाला यश आले आहे. मात्र, अजूनही १५८ कोटी रुपयांची थकबाकी त्यांच्याकडे आहे.
संबंधित कारखाना क्षेत्रातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थकबाकी वसुलीची पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मागील हंगामात निर्यात अनुदानापोटी केंद्र सरकारकडून ४५ रुपये प्रति टन या प्रमाणे रक्कम मिळणार होती. त्या रकमेसाठी अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम थांबविली होती. परंतु, या कारखान्यांनी दिवाळीपूर्वीच थकीत रक्कम देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.