पहिल्या शतकातला बाप्पा सापडला!
By admin | Published: September 4, 2016 02:21 AM2016-09-04T02:21:29+5:302016-09-04T02:21:29+5:30
अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सगळीकडे धामधूम सुरू आहे. चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणपतीची विविध रूपे पाहता भारतातील सर्वांत
- स्नेहा मोरे
अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सगळीकडे धामधूम सुरू आहे. चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणपतीची विविध रूपे पाहता भारतातील सर्वांत पहिल्या गणेशाची प्रतिमा कशी होती? कितव्या शतकात सापडला बाप्पा? या सगळ्याचा आता उलगडा झाला आहे. मुंबईस्थित डॉ. प्रकाश कोठारी यांच्या संग्रहात नाण्यावरील गणेशप्रतिमा ही सर्वांत जुनी म्हणजे पहिल्या शतकातील प्रतिमा आहे. त्यामुळे देशातला हा बाप्पा सगळ्यात जुना बाप्पा असल्याचे म्हटले जाते.
मरिन ड्राइव्ह येथे राहणारे सेक्सॉलॉजिस्ट डॉ. प्रकाश कोठारी यांना विविध दुर्मीळ वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद आहे. त्यामुळे बऱ्याचदा मुंबईतील चोरबाजारात त्यांचा फेरफटका होत असे. या ठिकाणी जाऊन दुर्मीळ गोष्टी न्याहाळायच्या आणि आपल्या संग्रहाचा खजिना वाढवायचा हा जणू त्यांचा नित्यक्रम. असेच एकदा चोरबाजारात दुर्मीळ वस्तूंच्या शोधात असताना त्यांना हे नाणे दिसले. त्या वेळी त्या विक्रेत्याला काहीशा विनवण्या करून त्यांनी हे नाणे विकत घेतले. त्यानंतर घरी आल्यावर या नाण्याचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केले असता असे आढळून आले की, या नाण्याच्या एका बाजूला नंदी आणि ब्राह्मण लिपीत ‘जागेस्वरा’ असा संदेश लिहिला आहे; तर दुसऱ्या बाजूला दोन हातांचा गणेश, लाडूंनी भरलेले पात्र आणि गणपतीच्या डोक्याभोवती प्रकाशमय आभावली आहे. या नाण्याचे वजन २.९८ ग्रॅम असून, त्यावर टेराकोटाचा मुलामा आहे.
उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक विभागांतर्गत असणाऱ्या दुर्मीळ आणि कला खजिना विभागाचे तज्ज्ञ डॉ. ओम प्रकाश लाल श्रीवास्तवा यांनी हे नाणे पहिल्या शतकातील किंवा त्याही पूर्वीचे असल्याचे सांगितले आहे. याविषयी, इंडियन कॉईन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी यांनाही विचारणा केली असता त्यांनी हे नाणे तिसऱ्या वा चौथ्या शतकातील असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे गणेश प्रतिमेचे नाणे सर्वांत प्राचीन असल्याचे डॉ. कोठारी यांनी सांगितले. याशिवाय, डॉ. कोठारी यांच्याकडे अनेक दुर्मीळ आणि वैविध्यपूर्ण गणेश प्रतिमा, नाणी आणि चित्रांचा खजिना आहे.
मात्र सर्वांत जुनी गणपतीची प्रतिमा चीनमध्ये ५३१ साली सापडल्याचे निरीक्षण इतिहासकारांनी मांडले आहे. शिवाय, भारतातील बऱ्याचशा गणेश प्रतिमा सहाव्या शतकाच्या जवळपास असल्याचे म्हटले जाते. मात्र, कोठारी यांच्याकडील हा बाप्पा पहिल्या वा दुसऱ्या शतकातील असल्याचा निर्वाळा पुरातत्त्व आणि इतिहास क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. या नाण्याचा अभ्यास करून कर्नाटक येथील विद्यापीठाचे एन्शियंट इंडियन हिस्ट्रीचे प्राध्यापक डॉ. श्रीनिवास रित्ती यांनी हे नाणे चौथ्या वा पाचव्या शतकातील असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. तर केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या एपीग्राफीचे संचालक टी.एस. रविशंकर यांनी हे नाणे दुसऱ्या शतकातील असल्याचे म्हटले आहे.