फादर फ्रान्सिस दिब्रिटो... वसईतलं बावनकशी सोनं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 03:33 AM2019-09-23T03:33:13+5:302019-09-23T03:35:38+5:30
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि संपूर्ण वसई तालुक्यात एकच जल्लोष पसरला. ते कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू असले, तरी पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. या निमित्ताने वसईतील या अस्सल मराठमोळ्या व्यक्तिमत्त्वाच्या कर्तृत्वाचा घेतलेला वेध...
फादर दिब्रिटो यांचा जन्म ४ डिसेंबर, १९४२ रोजी वसई तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील नंदाखाल गावी झाला. त्यांचे शिक्षण नंदाखालच्या संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झाले. १९७२ मध्ये त्यांनी कॅथलिक धर्मगुरूपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केले आहे. १९८३ ते २००७ या काळात ते ‘सुवार्ता’ या प्रामुख्याने मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित वार्तापत्राचे मुख्य संपादक राहिले होते. या मासिकाने केवळ ख्रिस्ती धर्मीयांसाठी मर्यादित न राहता, मराठी साहित्यातही स्वतंत्र ठसा उमटला.
‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. पुणे येथे १९९२ मध्ये झालेल्या १५व्या मराठी-ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ‘तेजाची पाऊले’, ‘संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची - इस्रायल आणि परिसराचा संघर्षमय इतिहास’, ‘आनंदाचे अंतरंग- मदर तेरेसा’, ‘सृजनाचा मोहोर’, ‘ओअॅसिसच्या शोधात’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’ हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी बराच काळ इस्त्राईल येथे राहून संशोधन केले होते. दिब्रिटो यांनी ‘बायबल- दी न्यू टेस्टामेंट’ या पुस्तकाच्या मराठीत अनुवादीत केलेल्या ‘सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा २०१३ या वर्षीचा ‘राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
महामंडळाच्या बैठकीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले, याचा आनंद आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी दिब्रिटो अत्यंत योग्य व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे सूत्रे सोपविताना मनस्वी आनंद होईल. दिब्रिटो यांनी बायबलचे नव्या पद्धतीने केलेले भाषांतर दिशादर्शक आहे. त्यांच्या आत्मकथनातून त्यांचा जीवनप्रवास मांडला गेला आहे. गांभीर्याने वाङ्मय व्यवहार करणारे ते साहित्यिक असून, मराठी संतपरंपरेशी त्यांचा धागा जुळला आहे.
- डॉ. अरुणा ढेरे, संमेलनाध्यक्षा.
स्वतंत्र विचारसरणी असलेला, आपली मते ठामपणे मांडणारा साहित्यिक संमेलनाध्यक्ष म्हणून लाभणे, योग्य आहे. लो. टिळक यांच्यानंतर ख्रिस्ती असूनही मराठी साहित्यप्रवाहाबद्दल विशिष्ट मांडणी करणारा म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड सार्थ वाटते.
- डॉ.अशोक कामत,
ज्येष्ठ साहित्यिक.
तिघांचा होणार सत्कार
ज्येष्ठ ग्रामीण कथाकार प्रा़ भास्कर चंदनशिव, शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे आणि हिंदी साहित्यविश्वात नावलौकिक प्राप्त केलेले अमरावती येथील लक्ष्मण नथ्थूजी शिरभाते यांचा साहित्य संमेलनात सत्कार करण्याचा निर्णय अ.भा. साहित्य महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला़
येशू ख्रिस्ताच्या प्रेरणेने समाजाला आयुष्य समर्पित करणारे लेखक, विचारवंत म्हणून फादर दिब्रिटो हे ख्रिस्ती समाजासह मराठी माणसाला प्रेरक ठरणारे कर्तृत्व आहे. फादर दिब्रिटो यांचे धर्मचिंतन राष्ट्रीय एकात्मतेशी सुसंगत असून, मराठी साहित्य समृद्ध करणारे आहे. भारतीय संविधानाला सुसंगत धर्मनिरपेक्ष भूमिका मांडण्यासाठी ते परिचित आहेत. मराठी संतपरंपरेचा दिब्रिटो यांनी केलेला अभ्यास मराठीची थोरवी अधोरेखित करणारा आहे.
- डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष.
फादर दिब्रिटो हे माझे स्नेही आहेत. त्यांनी मराठी भाषेची खूप मोठी सेवा केलेली आहे. अत्यंत प्रेमाने आणि निष्ठेने ते मराठी साहित्याची सेवा करत आहेत. दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मकथनाचे प्रकाशन वसईला माझ्या हस्ते झाले, याचा विशेष आनंद आहे. कोणताही दुराग्रह, पूर्वग्रह न बाळगता धर्मनिरपेक्ष भूमिका मांडणारे अशी त्यांची ओळख आहे.
- डॉ. सदानंद मोरे, माजी संमेलनाध्यक्ष.
‘फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचे नाव समोर होते़ महामंडळाच्या बैठकीत त्यांची एकमताने संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली़ कुठल्याही चर्चेशिवाय त्यांचे नाव निश्चित करण्यात आले़ याचे महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मला समाधान वाटते़ दिब्रेटो यांनी विविध प्रकारचे साहित्य निर्माण केले़ यात ललित, वैचारिक, प्रवासवर्णन, कविता अशा अनेक प्रकारांचा समावेश आहे़ ’
- कौतिकराव ठाले पाटील,
अध्यक्ष, अ़ भा़ मराठी साहित्य महामंडळ
मराठी साहित्य संस्थात्मक व्यवहार आणि एकूणच मराठीसाठी ही फार आश्वासक घटना आहे. फादर दिब्रेटो यांचे व हा निर्णय घेणाºया महामंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि या निर्णयात सहभागी सर्व घटक, समाविष्ट व संलग्न संस्था या साऱ्यांचेही या ऐतिहासिक स्वरूपाच्या निर्णयाबद्दल मनपूर्वक अभिनंदन करायला हवे.’
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी,
माजी अध्यक्ष, अ़ भा़ मराठी साहित्य महामंडळ
मराठी साहित्यामध्ये ख्रिस्ती लेखकांचे प्रमाण खूप कमी आहे. बाबा पदमजी यांच्यापासून वाङ्मय परंपरा सुरू झाली. फादर फ्रान्सिस दिब्रिटो याच परंपरेचा वारसा पुढे नेत आहेत. त्यांचे लेखन अभ्यासपूर्ण आणि वैचारिक असते. सध्याच्या धार्मिक उन्मादाच्या पार्श्वभूमीवर खराखुरा सर्वधर्मसमभाव जपणारा लेखक संमेलनाध्यक्षपदी विराजमान होतो आहे, याचा मनस्वी आनंद झाला आहे.
- लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष
अध्यक्षपदासाठी सन्मानाने दिब्रिटो यांची निवड होत आहे, याचा आनंद आहे. या वर्षी मसापने फादर दिब्रिटो यांचे नाव सुचविले. एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
- प्रा. मिलिंद जोशी,
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद.