भारतीय व्यंगचित्रांचे पितामह : शंकर
By admin | Published: May 4, 2016 09:30 PM2016-05-04T21:30:07+5:302016-05-04T21:30:07+5:30
कायामकुलममध्ये (केरळ) ३१ जुलै १९०२ रोजी जन्मलेल्या शंकर यांना भारतीय व्यंगचित्रांचे पितामह मानले जाते. कुटुंबीयांच्या इच्छेनुसार १९२७ मध्ये मुंबईत विधी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या शंकर यांचे
कायामकुलममध्ये (केरळ) ३१ जुलै १९०२ रोजी जन्मलेल्या शंकर यांना भारतीय व्यंगचित्रांचे पितामह मानले जाते. कुटुंबीयांच्या इच्छेनुसार १९२७ मध्ये मुंबईत विधी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या शंकर यांचे मन मात्र रेखाचित्रे आणि व्यंगचित्रांमध्येच गुंतले होते. वर्षभरातच कायद्याचा अभ्यास सोडत ते व्यावसायिक नरोत्तम मोरारजी यांचे खासगी सचिव म्ैणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांना वेळ मिळताच कॅरिकेचर बनविण्याची शालेय जीवनातील आपली कला पारखण्याची संधी मिळाली.
त्यांनी द बॉम्बे क्रॉनिकल, द फ्री प्रेस जर्नल आणि द वीकली हेराल्डसारख्या वृत्तपत्रांना नियमित व्यंगचित्र पाठविण्याचा सपाटा लावला. १९३२ मध्ये द हिंदुस्तान टाइम्सचे संपादक जोसेफ यांनी नोकरीचा प्रस्ताव देताच शंकर यांच्या जीवनाला नवे वळण लाभले. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सर्वाधिक पसंतीच्या व्यंगचित्रांमध्ये त्यांचा समावेश होता. नेहरूजी स्वत:वर शंकर यांनी बनविलेल्या व्यंगचित्रांनाही प्रशंसेची पावती देत असत. सहा वर्षांच्या नोकरीनंतर या वृत्तपत्राने शंकर यांना अभ्यासासाठी वर्षभराची सुटी मंजूर केली होती. त्यांनी लंडनला जाऊन व्यावसायिक शिक्षण घेतले. १९४६ मध्ये शंकर यांनी हिंदुस्तान टाइम्समधील नोकरी सोडून ‘शंकर्स वीकली’ हे राजकीय व्यंगचित्रांचे पहिले साप्ताहिक सुरू केले.शंकर यांना मुलांचा अतिशय लळा होता. ‘शंकर्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स कॉम्पिटिशन’मध्ये १३५ देशातील मुले सहभागी झाली होती. १९५४ मध्ये हंगेरीची सुंदर बाहुली मिळाल्यानंतर त्यांचे जीवन पालटले. त्यांनी बाहुल्यांच्या प्रदर्शनासोबत मुलांच्या पुस्तकांचे प्रकाशनही एकाच छताखाली आणले. त्यांनी १९५७ मध्ये चिल्ड्रन बुक ट्रस्टची स्थापना केली होती. शंकर इंटरनॅशनल डॉल म्युझियममध्ये सध्या ८५ देशांचा वेश केलेल्या ६५०० बाहुल्या आहेत. त्यांनी १९६८ मध्ये ‘चिल्ड्रन्स वर्ल्ड’ हे सचित्र मासिक सुरू केले होते. शंकर्स वीकली या बहुचर्चित व्यंगचित्र साप्ताहिकाचे प्रकाशन आॅगस्ट १९७५ मध्ये बंद पडले. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान झालेल्या या महान व्यंगचित्रकाराने वयाच्या ८७ व्या वर्षी २६ डिसेंबर १९८९ रोजी जगाचा निरोप घेतला.