सिंचन अधिका-याचा मुलगा सापडला जळगाव रेल्वे स्टेशनवर भीक मागताना
By admin | Published: April 30, 2016 06:37 PM2016-04-30T18:37:21+5:302016-04-30T18:37:21+5:30
जळगाव रेल्वे स्टेशनवर भीक मागताना आढळून आलेला 16 वर्षाचा मुलगा मध्यप्रदेश सिंचन विभागातील अधिका-याचा असल्याची माहिती मिळाली आहे
Next
>वडील रागावल्याने सहा वर्षापूर्वी सोडले होते घर
जळगाव: हरवलेल्या बालकांच्या संदर्भात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र’ या शोध मोहिमेत पाच मुले आढळली असून त्यात एक 16 वर्षाचा मुलगा हा ग्वालियर (मध्यप्रदेश) येथील असून तो जळगाव रेल्वे स्टेशनवर भीक मागताना आढळून आला आहे. त्याचे वडील हे मध्यप्रदेश सिंचन विभागात अधिकारी आहेत. ते रागावल्याने त्याने सहा वर्षापूर्वी घर सोडले होते. जळगाव रेल्वे स्टेशनवर तो भीक मागून पोट भरत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली.
रेल्वे स्टेशनवर भीक मागताना ताब्यात घेतलेल्या मध्यप्रदेशातील राजू (नाव बदलेले आहे)ची पोलिसांनी चौकशी केली. सहा वर्षापूर्वी वडील रागावल्याने संतापाच्या भरात त्याने घर सोडले होते. रेल्वे स्टेशन गाठून मुंबईकडे जाणा-या गाडीत बसलो व जळगावला उतरलो,कोणते शहर आहे याची जाणीवही नव्हती, असे त्याने चौकशीत सांगितले. सहा वर्षापासून तो स्टेशन परिसरातच भीक मागून जीवन जगत होता. मळलेले व फाटलेले कपडे त्याच्या अंगात होते. वडील सिंचन विभागात नोकरीला आहेत तर आई घरीच असते. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे. दरम्यान, हा मुलगा सुशिक्षित घराण्यातील असल्याने जिजा गुट्टे यांनी ग्वालियर पोलिसांशी संपर्क साधून त्याच्या वडीलांच्या नावावसह इत्यंभूत माहिती त्यांना दिली.
'ग्वालियर पोलिसांशी संपर्क साधून मुलाविषयी माहिती त्यांना देण्यात आली आहे. संपर्क झाल्यानंतर त्यांच्या ताब्यात देणार आहे. सध्या त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे', अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा उपनिरीक्षक जिजा गुट्टे यांनी दिली आहे.