खड्ड्यांमुळे गमावला मुलाने जीव, खड्डे बुजवून वडिलांची अनोखी श्रद्धांजली
By Admin | Published: February 1, 2016 12:57 PM2016-02-01T12:57:52+5:302016-02-01T13:40:35+5:30
रस्त्यावरील खड्ड्यामुळे मुलाने जीव गमावल्यानंतर त्याचे वडील रस्त्यांवरील खड्डे स्वत: बुजवून मुलाला श्रद्धांजली वाहत आहेत.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - रस्त्यावरील उघड्या पॉटहोलला धडकून बाईकच्या झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे दु:ख विसरता यावे आणि अशी परिस्थिती इतर कोणावरही येऊ नये यासाठी दादाराव बिल्होरे गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावरील उघडे खड्डे माती-विटांनी भरत आहेत. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, मरोळचे रहिवासी असलेले बिल्होरे यांनी गेल्या महिन्याभरात एक डझन वा त्याहून अधिक खड्डे बुजवत आपल्या मुलाला श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न केला आहे.
मरोळमधील विजयनगर येथे भाजी विकण्याचा व्यवसाय करणारे बिल्होरे यांनी रात्रंदिवस मेहनत करून आपल्या मुलांना शिकवलं. १६ वर्षीय प्रकाश हा इंग्रजी मीडियममध्ये शिकणारा त्यांच्या कुटुंबातील पहिला सदस्य होता. मात्र गेल्या वर्षी २८ जुलै रोजी तो त्याचा चुलतभाऊ रामसह भांडूपच्या नवजीवन एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन परत येत होता. तेव्हा मुसळधार पावसामुळे जोगेश्वरी-विक्रोली लिंक रोडवर पाणी साचल्याने उघडा असलेला पॉटहोल न दिसल्याने त्यांच्या बाईकचा अपघात झाला आणि प्रकाशला जीव गमवावा लागला तर त्याचा भाऊ रामलाही डोक्याला गंभीर जखम झाली.
मात्र या घटनेनंतर दादाराव यांचे अवघे आयुष्यच बदलले. प्रकाशला न्याय मिळावा आणि निष्काळजीपणे रस्ता खोदून, पॉटहोल्स उघडी टाकणा-यांना कठोर शिक्षा मिळावी यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून ते लढा देत आहेत. मात्र कायदेशीर लढा सुरू असतानाच इतर कोणत्याही निष्पाप नागरिकांना असा त्रास वा कोणाचाही वियोग सहन करावा लागू नये यासाठी ज्या रस्त्यावर उघडे पॉटहोल्स दिसतात, त्यावर दादाराव स्वत:च्या हातांनी दगड-विटा टाकून ते बुजवात. ' माझ्या मुलाबाबतीत जे झाले ते इतर कोणाबाबतीत व्हावे असे मला वाटत नाही, माझ्या मुलालाही तसं वाटलं नसतं. तो अतिशय हुशार, भरभूरन जगणारा आणि मनमिळावू मुलगा होता. त्याच्या मृत्यूला जबाबदार असणा-यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तर मी लढा देईनच. पण जे मला आणि माझ्या कुटुंबाला सहन करावं लागलं, तशी वेळ इतरांवर येऊ नये असं मला वाटतं' असा भरल्या डोळ्यांनी दादाराव सांगतात.
स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून इतरांच्या भल्यासाठी हे काम करणा-या दादाराव यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या परिसरातील इतर नागरिकांनाही त्यांना मदत करण्यास सुरूवात केली आहे.