कर्जफेडीकरिता वडिलांकडे तगादा

By admin | Published: March 7, 2016 03:41 AM2016-03-07T03:41:53+5:302016-03-07T03:41:53+5:30

हसनैनने आईला माहेरुन मिळालेल्या मालमत्तेच्या वाट्यातील ३० लाख रुपये अगोदरच हडपले होते. याखेरीज वडील अन्वर यांच्या नावावरील आनंदनगर येथील झोपड्या विकण्यासाठी त्याने वडिलांकडे तगादा लावला होता

Father to repay the loan | कर्जफेडीकरिता वडिलांकडे तगादा

कर्जफेडीकरिता वडिलांकडे तगादा

Next

बहिणींना वाटा देण्यास दिला होता नकार :
झोपड्या विकण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न
जितेंद्र कालेकर ,  ठाणे
क्रुरकर्मा हसनैनने आईला माहेरुन मिळालेल्या मालमत्तेच्या वाट्यातील ३० लाख रुपये अगोदरच हडपले होते. याखेरीज वडील अन्वर यांच्या नावावरील आनंदनगर येथील झोपड्या विकण्यासाठी त्याने वडिलांकडे तगादा लावला होता. हसनैनने केलेले कर्ज फेडण्याकरिता झोपड्या विकण्याचा आग्रह धरतानाच त्यामध्ये बहिणींना हिस्सा देण्यास त्याने विरोध केला होता. यावरून वरेकर कुटुंबात वरचेवर खटके उडत असल्याची माहिती आता पोलीस चौकशीत उघड झाली आहे.
हसनैनचे वडील अन्वर यांच्या नावावर आनंदनगर येथे जमीन होती. ती त्यांनी विकली होती. मात्र, त्याच जमिनीवर दोन झोपड्या आहेत. त्याची घरपट्टी ते भरत असल्यामुळे त्याचा ताबा त्यांच्याकडे होता. त्या झोपड्या विकून कर्ज फेडतो, असा तगादा त्याने वडीलांकडे लावला होता. परंतु, वडील याला फारसे उत्सुक नव्हते. कारण झोपड्या विकल्यानंतर येणाऱ्या पैशातून बहिणींना वाटा देण्याचे काहीच कारण नाही, यावरही हसनैन ठाम होता. झोपड्या विकण्याकरिता तो सतत वडीलांना धमकावत होता. तुम्ही केवळ मुलींचा विचार करता, मला अडचणीत मदत करा, यावरून त्याचा वडिलांशी नेहमी वाद सुरु असायचा, असेही सुबियाने जबानीत म्हटले आहे. हसनैनचा हा जाच असह्य झाल्यावर वडवलीतील राहते घर विकून कर्ज फेडण्यास त्याला वडिलांनी सुचविले होते. परंतु, ते घर आईचे वडील गुलजार यांच्याकडून आईला मिळाले होते आणि ते शोएब वरेकर यांच्या नावावर असल्यामुळे त्याला ते विकता येत नव्हते.अल्फीयामुळेच वाचला जीव
रात्री सर्वजण जेवणासाठी गेले. परंतु, अल्फीया सारखीच रडत असल्यामुळे तिला सुबिया दूध पाजत होती. रात्री ११.४५ वा. पती सोजब यांना सुबियाने फोन करून न्यायला येण्यास सांगितले. मात्र त्याने सकाळीच न्यायला येतो, असे सांगितले. उशिरा जेवायला गेल्याने गुंगीचे औषध घातलेले पदार्थ फारसे पोटात गेले नाही व मुलगी सतत कुरकुरत असल्याने सुबियाला उशिरा झोप लागली. अल्फीयाचे रडणे तसेच जाग आल्यानंतर सुबियाने दाखवलेले धाडस व प्रसंगावधानामुळे ती आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. गॅलरीत जाण्यालाही बंदी
कासारवडवलीतील हसनैनचे घर तळ अधिक एक मजल्याचे होते. घरामध्ये पहिल्या माळ्यावरील बेडरूम फक्त हसनैन, त्याची पत्नी जबीन आणि मुलांसाठीच होती. घरातील इतर कोणी तिथे जात नसत. वरच्या हॉलच्या बाजूला तीन गॅलरी आहेत, परंतु घराच्या खाली बाहेरील मुले बसलेली असतात, या कारणास्तव बहिणींना हसनैनने गॅलरीत जाण्यास सक्त मनाई केली होती. काही कार्यक्रमानिमित्त माहेरी राहण्याचा प्रसंग आलाच, तर तळमजल्यावरील हॉलमध्येच सर्व जण झोपत असत, असेही तिने सांगितले.हसनैन हा बहिणींसह पत्नीवरही संशय घ्यायचा. बाहेरची व्यक्ती घरात येणे त्याला कधीच आवडले नाही. सुबियाने पहिली ते सातवीपर्यंत कासारवडवलीत तर दहावीपर्यंतचे शिक्षण ठाण्याच्या महागिरीतील शाळेतून घेतले. त्यानंतर २००८ मध्ये राबोडीतील आयडीयल कॉलेजमध्ये तिने अकरावीसाठी प्रवेश घेतला. बारावीला मात्र प्रवेश घेण्यास हसनैनने तिला मनाई केली.
कारण सुबियाच्या एका बहिणीचे तिच्याच एका नातेवाईकाबरोबर मैत्रीचे संबंध होते. ही गोष्ट हसनैनच्या कानावर गेल्यावर तो बिथरला. त्याला हे संबंध मान्य नसल्यामुळे बहिणीला व तिच्या मित्रालाही तो मारण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु, आजी-आजोबांनी त्याला असे करण्यापासून रोखले होते. मात्र यामुळे सुबियाला पुढील महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास हसनैनने विरोध केला, अशी माहितीही सुबियाने दिली आहे.

Web Title: Father to repay the loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.