मुलाला शिक्षणासाठी अमेरिकेत पाठविण्यासाठी वडीलांनी विकली दोन एकर शेती

By admin | Published: August 18, 2016 05:03 PM2016-08-18T17:03:55+5:302016-08-18T17:03:55+5:30

अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नुकताच रूजू झालेल्या युवकाने आपला पहिला पगार गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला.

The father sold two acres of farmland to send the child to America for education | मुलाला शिक्षणासाठी अमेरिकेत पाठविण्यासाठी वडीलांनी विकली दोन एकर शेती

मुलाला शिक्षणासाठी अमेरिकेत पाठविण्यासाठी वडीलांनी विकली दोन एकर शेती

Next

नितीन गव्हाळे

अकोला, दि. 18 : घरची परिस्थिती जेमतेम. वडील शेतकरी. पाच ते सहा एकर शेती. त्यातही कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ. पिक घरात येईल. याची श्वासती नाही. वडीलांनी अशाही परिस्थितीतही आपल्याला शिकविले. संघर्ष करीत, अडथळे पार करावे लागले. परंतु माझ्यासारखा असा प्रसंग कोणावर येऊ नये. पैशांअभावी कोणत्याही गरीब विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये या दृष्टीकोनातून अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नुकताच रूजू झालेल्या युवकाने आपला पहिला पगार गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला.

प्रवीण दादाराव नागरे(२३) हे त्याचे नाव.तो बोरगाव मंजू येथे राहणारा. अल्पश: शेतीतील उत्पन्नातून वडीलांनी त्याला शिकविले. मुलातील गुणवत्ता पाहून वडीलांनी कधी हात आखडता घेतला नाही. प्रसंगी कर्ज काढून, उसने पैसे घेऊन त्याला शिकविले. वडीलांच्या कष्टाचे मुलाने सार्थक केले. मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला आणि आज अमेरिकेतील बोस्टन शहरात गलेलठ्ठ पगारावर काम करतो. प्रवीणचे प्राथमिक शिक्षण जि.प. शाळेत झाले. पुढील दहावीपर्यंचे शिक्षण परशुराम नाईक विद्यालयात झाले. प्रवीण अभ्यासात तसा सर्वसाधारण. विज्ञान प्रदर्शनीमध्ये त्याच्यातील गुणवत्ता विज्ञान शिक्षक विजय पजई यांनी हेरली. त्यांनी त्याला मार्गदर्शन केले. त्याची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड झाली. थोर शास्त्रज्ञ डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनीही त्याच्या विज्ञान प्रकल्पाचे कौतुक केले.

पुढे अब्दुल कलाम यांच्या कार्यशाळेसाठी निवडक विद्यार्थ्यांमधून प्रवीणची निवड झाली. अब्दुल कलामांचे भाषण ऐकून जीवनात काही वेगळे करण्याची उर्मी त्याच्यात निर्माण झाली. पुढे प्रवीणने पुणे येथे बीई केले. तो सॉफ्टवेअर इंजिनियर झाला. अमेरिकेतील ब्रिगहम्टन येथे एमईसाठी त्याची निवड झाली. परंतु वडीलांकडे त्याला अमेरिकेत पाठविण्याइतपत पैसे नव्हते. वडीलांनी मागचापुढचा विचार न करता थेट दोन एकर शेत विकले आणि प्रवीणला अमेरिकेला पाठविला. तेथे एमई पूर्ण केल्यानंतर जुलैमध्ये त्याला बोस्टन शहरातील कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली. महिन्याला पाच लाख सत्तर हजार रूपये पगार मिळाला. आपल्यावर जी परिस्थिती ओढवली. ती इतर गरीब विद्यार्थ्यांवर ओढावू नये. यासाठी त्याने वडीलांना पगाराचा धनादेश पाठविला आणि ५0 हजार १0१ रूपयांची मदत त्याने परशुराम नाईक विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यास वडीलांना सांगितले. त्यानुसार वडीलांनी स्वातंत्र्य दिनी धनादेश संस्थेच्या सुपूर्द केला. प्रवीणची गरीब विद्यार्थ्यांप्रती तळमळ प्रेरणादायी आहे.

गरजु विद्यार्थ्यांना लागेल तेवढी मदत देण्याची तयारी
अनेकजण विपरीत परिस्थितीत संघर्ष करतात. परंतु दिवस पालटले की मागचे सगळे विसरून जातात. पैशांची उर्मी दाटून येते. मी, माझे कुटूंब आणि माझा पैसा. याशिवाय दुसरे कोणतेच ध्येय व्यक्तीसमोर नसते. परंतु प्रवीणने घरची आर्थिक परिस्थिती हलाखिची असतानाही पहिल्या पगारातील थोडी थोडकी नव्हे ५0 हजार रूपयांची मदत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिली. एवढेच नाहीतर कोणत्या गरजु परंतु गुणवंत विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये. यासाठी त्याने लागेल तेवढी आर्थिक मदत देण्याची तयारी दाखविली आहे.

Web Title: The father sold two acres of farmland to send the child to America for education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.