बाप एकटाच स्मशानात जळत होता; मुले शेवटपर्यंत आलीच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 05:57 PM2019-11-11T17:57:56+5:302019-11-11T17:58:04+5:30

वेळे येथील काळीज पिळवटून टाकणारी हृदयद्रावक घटना

The father was alone in the cemetery; The children didn't come until the end | बाप एकटाच स्मशानात जळत होता; मुले शेवटपर्यंत आलीच नाहीत

बाप एकटाच स्मशानात जळत होता; मुले शेवटपर्यंत आलीच नाहीत

googlenewsNext

- दत्ता यादव 

सातारा : कौटुंबिक कलहातून मुले आणि वडिलाचं नातं इतकं ताणलं जातं, हे पहिल्यांदाच अनेकांना अनुभवयास आलं. निवारा केंद्रात वडिलाचं निधन झाल्यानंतर त्यांच्या चार मुलांना आणि दोन मुलींना कळविण्यात आलं. पोरांची वाट बघत अखेर एकटाच स्मशानात जळत बाप सरणावर गेला. पण मुलं शेवटपर्यंत आलीच नाहीत. मनाला चटका लावणारी ही घटना वाई तालुक्यातील (वेळे) यशोधन निवारा केंद्रामध्ये घडली आहे.

साताऱ्यातील गोडोली परिसरामध्ये वर्षभरापूर्वी ९० वर्षांचे गृहस्थ फिरत होते. त्यांच्या अंगावर मळकट कपडे आणि रात्रंदिवस रस्त्यावरच त्यांचा मुक्काम असायचा. याची माहिती वाई येथील (वेळे) यशोधन निवारा केंद्राचे अध्यक्ष रवी बोडके यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी त्या आजोबांना आपल्या निवारा केंद्रामध्ये आश्रय दिला.
 

गेल्या एक वर्षापासून त्या आजोबांचं आणि रवी बोडके यांचे अनोख नातं निर्माण झालं होतं. निवारा केंद्रामध्ये त्यांना बाबा म्हणूनच सर्वजण हाक मारत होते. निवांत वेळी माळ जपणे, पोती वाचणे, ज्ञानेश्वरी आणि गीता वाचणे असे छंद ते बाळगत होते. त्यांच्या येण्याने निवारा केंद्रामधील इतर वृद्धांना त्यांचा आधार वाटत होता.
आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी मुंबईमध्ये मील कामगार म्हणून घालवले होते. त्यांना चार मुले व दोन मुली. ज्या वडिलांनी हयातीत असताना आपल्या लेकरांच्या प्रेमापोटी मुलांना आपली घर, शेती अशी सर्व संपत्ती नावावर करून दिली होती. मात्र, मुलांनी उतार वयात वडिलांचा सांभाळ करण्यास पाठ फिरवली.

तसेच असे असतानाही हा सारा कटू अनुभव विसरून ते निवारा केंद्रामध्ये आपले उर्वरित आयुष्य कंठत होते. मात्र, नियतीला हे मान्य नसावे. त्यांच्या छातीमध्ये अचानक वेदना होऊ लागल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांनी रवी बोडके यांच्याजवळ एक इच्छा बोलून दाखविली. ‘मला माझ्या मुलांना भेटायचे आहे.’ बोडके यांनी प्रयत्नांची पराकष्टा करून मुलांचे मोबाईल नंबर मिळविले. पण प्रत्येक मुलाकडून आणि मुलीकडून आत्ता वेळच नाही. परत फोन करू नका, अशी उत्तरे बोडके यांना मिळाली.

रवी बोडके हे ऐकून आवाक् झाले. पण बाबांना काय सांगायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला. उपचार सुरू असताना त्यांची काळजी घेण्याबरोबरच रवी बोडके त्यांना आधार देत होते. परंतु  त्यांना पुन्हा हार्टअ‍ॅटॅक आला अन्  आजोबांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. काळीज चिरावं तशा बोडके यांना वेदना झाल्या. मनावर दगड ठेवून जड पावल्यांनी बोडके जिल्हा शासकीय रुग्णालयात गेले.  गेले. आजोबांचा चेहरा पाहून बोडके यांचे मन गहिवरून आले. आजोबांनी निवरा केंद्रामध्ये केलेल्या गप्पागोष्टी  बोडके यांच्या नजरेसमोरून तरळल्या.

पुन्हा एकदा त्यांच्या मुलांना सांगण्याची वेळ रवी बोडके यांच्यावर आली. परत एकदा त्यांच्या मोठ्या मुलाला बोडके यांनी फोन केला. ‘तुमचे वडील गेले,’ असे त्याला सांगितले. यावर तो मुलगा म्हणाला, ‘मग मी काय करू, मी तुम्हाला सांभाळायला सांगितले होते का, तुमचं तुम्ही बघा, नाहीतर बेवारसपणे सोडा. मी येणार नाही आणि फोन पण करू नका,’ हे ऐकून बोडके यांना पुन्हा एकदा धक्काच बसला. पण बोडके यांनी हार मानली नाही.

आता आपण यांचा मुलगा आहे, हे मानून बोडके यांनी सर्व कागदोपत्री शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यानंतर त्यांनी बाबांवर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. जड अंत:करणाने जवळच्याच स्मशानभूमीमध्ये विधिवत सर्व सोपस्कार पूर्ण करून डोळ्याच्या कडा पुसत बोडके यांनी त्यांना अग्नी दिला. ज्या मुलांना जन्माला घातले, वाढवले त्यांची वाट पाहण्यातच जीव गेला आणि शेवटी बाप वाट पाहतच सरणावरती गेला.

खात्यावर सव्वा लाख

आजोबांचे निधन झाल्यानंतर निवारा केंद्रामध्ये असलेली त्यांची छोटीशी पेटी उघडली. त्यामध्ये त्यांना एका बँकेचे पासबुक सापडले. त्यांच्या खात्यावर तब्बल सव्वा लाखांची रक्कम असल्याचे समोर आले. मुलांना याची माहिती कानोकानी मिळाल्यानंतर त्यांनी बोडके यांच्याकडे बँक पासबुक आणि इतर साहित्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप त्यांना पासबुक बोडके यांनी दिले नाही. समाजात अशा प्रकारचेही लोक असतात, हे पाहून अनेकांची मने हेलावून गेली.

Web Title: The father was alone in the cemetery; The children didn't come until the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू